एकही पात्र शेतकरी कर्जमाफीतून सुटू नये!
By admin | Published: July 8, 2017 02:22 AM2017-07-08T02:22:07+5:302017-07-08T02:22:07+5:30
जिल्हाधिकाऱ्यांचे बँकांना निर्देश: थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती तातडीने सादर करा!
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शानानाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेत जिल्ह्यातील पात्र एकही शेतकरी सुटता कामा नये, असे निर्देश देत कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांची माहिती तातडीने सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी शुक्रवारी सायंकाळी बँक अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनाच्या सभागृहात जिल्ह्यातील बँक अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. सन २००९ ते ३० जून २०१६ पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने कर्जमाफीची योजना जाहीर केली आहे. या योजनेत पात्र थकबाकीदार शेतकरी दीड लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीस पात्र ठरणार आहेत. या पृष्ठभूमीवर कर्जमाफी योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करून कर्जमाफी योजनेत जिल्ह्यातील पात्र एकही शेतकरी सुटणार नाही, याबाबत दक्षता घेऊन पात्र थकबाकीदार सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला पाहिजे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी बँक अधिकाऱ्यांना दिले, तसेच कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यातील पात्र ठरणाऱ्या थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती तातडीने गोळा करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी बँक अधिकाऱ्यांना दिल्या. कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत बँकांकडून सुरू असलेल्या कामाचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी घेतला. या बैठकीला जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक तुकाराम गायकवाड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, जिल्हा उपनिबंधक जी.जी. मावळे, रिझर्व्ह बँकेचे एलडीओ राजशेखरन, नाबर्डचे राजेंद्र वाळके यांच्यासह जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व राष्ट्रीयीकृत बँकांचे अधिकारी उपस्थित होते.
पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना त्रास होऊ नये!
यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील पीक कर्ज वाटपाचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी घेतला. खरीप पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे सांगत पीक कर्जासाठी जिल्ह्यात शेतकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही, याबाबत बँकांनी खबरदारी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी बँकांच्या अधिकाऱ्यांना दिले.
१२ जुलै रोजी घेणार आढावा!
कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत जिल्ह्यातील बँकांच्या कामाचा आढावा आणि पीक कर्ज वाटपाच्या कामाचा आढावा १२ जुलै रोजी आयोजित बैठकीत घेण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी बँक अधिकाऱ्यांना सांगितले.