कर्जमाफीच्या कामात हलगर्जी करू नका!
By admin | Published: July 13, 2017 01:03 AM2017-07-13T01:03:30+5:302017-07-13T01:03:30+5:30
जिल्हाधिकाऱ्यांचे बँकांना निर्देश : पात्र शेतकऱ्यांची माहिती शनिवारपर्यंत सादर करा!
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शेतकऱ्यांसाठी शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीच्या कामात शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याचे सांगत कर्जमाफीच्या कामात कोणत्याही प्रकारची हलगर्जी करू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी बुधवारी बँक अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले. कर्जमाफी योजनेत जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची माहिती शनिवार, १५ जुलैपर्यंत सादर करण्याचा ‘अल्टिमेटम’देखील जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांना दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात आयोजित बँक अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रामुख्याने नॅशनल इन्शुरन्स कंपनीचे विभागीय मुख्य अधिकारी श्रीकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक तुकाराम गायकवाड उपस्थित होते. कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीबाबत जिल्ह्यातील कामाचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी घेतला. कर्जमाफी योजनेसंदर्भात शासन निर्णयातील निकषांप्रमाणे बँकांनी वेळेत कार्यवाही करणे आवश्यक आहे. यासंबंधी अडचणी असल्यास मांडाव्यात; मात्र कर्जमाफीच्या कामात हलगर्जीपणा करू नये आणि जिल्ह्यातील पात्र एकही शेतकरी कर्जमाफी योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी बँक अधिकाऱ्यांना दिले. कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची अद्ययावत माहिती १५ जुलैपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी बँकांच्या अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या. या बैठकीला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि राष्ट्रीयीकृत बँकांचे अधिकारी उपस्थित होते.
पीक कर्ज वाटपात दिरंगाई केल्यास कारवाई!
यावर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात १ लाख १४ हजार शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे; परंतु अद्याप जिल्ह्यातील अनेक शेतकरी पीक कर्जाच्या लाभापासून वंचित असल्याच्या मुद्यावर नाराजी व्यक्त करीत उद्दिष्टाप्रमाणे ३१ जुलैपर्यंत जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांना दिले.
पीक कर्ज वाटपाच्या कामात दिरंगाई केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी यावेळी दिला.
पीक विम्याचा शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी प्रयत्न करा!
पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ देण्यासाठी विमा कंपन्या व बँकांनी प्रयत्न करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. या कामासाठी कृषी सहायक, ग्रामसेवक, तलाठ्यांची मदत घेण्याचे सांगत पीक विमा योजनेंतर्गत कामाचा दर आठवड्यात आढावा घेतला जाईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.