माझ्या नावावर अत्याचार नको; शुक्रवारी मूक धरणे आंदोलन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2017 01:24 AM2017-07-06T01:24:06+5:302017-07-06T01:24:06+5:30
विविध सामाजिक संघटना एकवटल्या : पत्रकार परिषदेत मांडली भूमिका
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : देशभरात धोक्यात आलेली सहिष्णुता, सामाजिक ऐक्य, विशिष्ट अजेंडा राबविण्यासाठी देशातील दलित, मुस्लीम, आदिवासी, ओबीसींवर होत असलेले अन्याय, अत्याचार आणि गोरक्षणाच्या नावाने सुरू असलेला उच्छाद यामुळे सर्वसामान्य नागरिक धास्तावलेला आहे. देशात सुरू असलेल्या या प्रकाराविरोधात जागरूक भारतीय नागरिक म्हणून ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेण्यात आला असून, ‘माझ्या नावावर अत्याचार नको’, या संकल्पनेवर जगात आणि देशात सुरू असलेल्या मूक आंदोलनाप्रमाणे अकोल्यातही शुक्रवारी आंदोलन पुकारण्यात येत असल्याची माहिती माजी मंत्री प्रा.अझहर हुसेन यांनी पत्रकार परिषदेत दिली.
देशातील सद्यपरिस्थितीसंदर्भात भाष्य करताना प्रा. अझहर हुसेन, डॉ. सुभाष तिवारी, राजेंद्र पातोडे यांनी देशातील सामाजिक ऐक्य, सोहार्द आणि बंधुभाव धोक्यात आला आहे. दिवसाढवळ्या देशातील बुद्धिवंत विचारकांच्या हत्या केल्या जात आहेत. पोलिसांना मारेकरी सापडत नाहीत. गोरक्षणाच्या नावावर कायदा बाजूला ठेवून झुंडशाहीचे राज्य निर्माण झाले आहे. हा सर्व प्रकार प्रशासन मूक डोळ्यांनी पाहत आहे. पंतप्रधान, राष्ट्रपती यासंदर्भात चिंता व्यक्त करतात; मात्र प्रत्यक्षात काही संघटना या चिंतांना अव्हेरून आपले काम सुरू ठेवत आहेत. हा सर्व प्रकार चिंताजनक असून, भविष्यात अराजकता निर्माण होऊ शकते, अशी भीती पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आली. त्यामुळेच सामान्य नागरिक म्हणून अकोला शहरातील विविध सामाजिक संघटना, संस्था, सामाजिक कार्यकर्ते बुद्धिजीवी नागरिक एकवटले असून, शुक्रवार ७ जुलै २०१७ रोजी दुपारी २ ते ४ पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मूक धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत संयोजकांनी दिली. या आंदोलनात सामान्य नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. पत्रकार परिषदेला माजी राज्यमंत्री अजहर हुसेन, डॉ. सुभाष तिवारी, सोशल जस्टीस फोरमचे राजेंद्र पातोडे, ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष मजहरखान, माजी शिक्षणाधिकारी पी. जे. वानखडे, संभाजी ब्रिगेडचे पंकज जायले, युवाराष्ट्रचे धनंजय मिश्रा, डॉ. नीलेश पाटील, मराठा सेवा संघाचे सरचिटणीस अविनाश नाकट, मुवमेंट फॉर पीस अॅण्ड जस्टीसचे शहजाद अन्वर, मो. अतिकुर रहमान, ज्येष्ठ नेते वली मोहम्मद, जनसत्याग्रह संघटनचे आसिफ खान, प्रा. सरफराज खान, जिल्हा दक्षता व संनियंत्रण समिती समाजकल्याणचे सदस्य गौरव कोहचडे, अन्वर शेख, अंधश्रद्धा निर्मूलनचे महानगर संघटक चंद्रकांत झटाले, नगरसेवक झिशान हुसैन, मो. शकील,नितीन सपकाळ, गणेश सुरजुसे, प्रा. संतोष हुसे, मो. उस्मान, सत्यप्रकाश आर्य, सोहेल अहेमद, शाहीद खान, मुस्लीम युवा मंच, जावेद जकारिया, कच्छी मेमन जमात, मो. शाकीर प्रामुख्याने उपस्थित होते.