वसतिगृह अनुदान वाटपाच्या फायलींची नोंदच नाही!
By admin | Published: October 27, 2016 03:43 AM2016-10-27T03:43:26+5:302016-10-27T03:43:26+5:30
आज द्यावे लागेल शो-कॉजचे स्पष्टीकरण; सहायक लेखाधिकारी थोरातही जबाबदार
अकोला, दि. २६- समाजकल्याण विभागातून १४ वसतिगृहांना वाटप केलेल्या लाखो रुपयांच्या अनुदान देयकाच्या फायलींची नोंद अर्थ विभागासह समाजकल्याणच्याही देयक नोंदवहीत झालेली नाही. त्यामुळे हा प्रकार संगनमताने केल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. त्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी मुख्य लेखा व वित्त अधिकारी गीता नागर, तत्कालीन प्रभारी समाजकल्याण अधिकारी विलास खिल्लारे, सहायक लेखाधिकारी आर. एम. थोरात यांना बजावलेल्या कारणे दाखवा नोटीसवर गुरुवारपर्यंत स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे.
समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात विद्यार्थी नसणे, कोणत्याही सुविधा नसणे सोबतच शासनाच्या अटी व शर्तींचेही पालन केले जात नाही. तरीही लाखो रुपयांचे अनुदान दरवर्षी दिले जाते. हा प्रकार राज्यात काही ठिकाणी घडला. त्यामुळे समाजकल्याण आयुक्तांनी अनुदान वाट पासाठी वसतिगृहांची तपासणी करण्याचे आदेश दिले. सोबतच १६ मार्च १९९८, १ ऑगस्ट २00८ आणि २६ नोव्हेंबर २0१३ च्या आदेशानुसारच अनुदान देण्याचे बजावले; मात्र आयुक्तांच्या आदेशासोबतच शासन निर्णयांकडेही दुर्लक्ष करीत १४ वसतिगृहांना लाखो रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले. त्यामध्ये मोठय़ा प्रमाणात अनियमितता झाली. वसतिगृहांना लाखो रुपये अनुदान वाटपात झालेल्या घोळाचा प्रकार ह्यलोकमतह्णने उघडकीस आणला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. त्यासाठी सप्टेंबर २0१५ नंतर वाटप केलेल्या संपूर्ण निधीचा लेखाजोखा तपासणीत हा धक्कादायक प्रकार समोर आला.
वित्त विभागाची अशीही तत्परता
एरवी अर्थ विभागात येणार्या फायलींमध्ये वारंवार त्रुटी काढत त्या परत केल्या जातात, असा अनेकांचा अनुभव आहे; मात्र समाजकल्याण विभागाच्या १४ वसतिगृहांना अनुदान देण्याच्या फायलींवर जादू झाल्यासारख्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी गीता नागर यांनी स्वाक्षरी केल्या. त्यातच लाखोंच्या रकमेचा व्यवहार असतानाही त्या फायलींची देयक नोंदवहीत नोंद केली नाही. सोबतच समाजकल्याण विभागाच्या देयक नोंदवहीतून फायली सादर झाल्या नसतानाही लाखोंची रक्कम कशी प्रदान केली, याचा खुलासा आता नागर यांना उद्या द्यावा लागणार आहे.
समाजकल्याण कर्मचार्यांच्या हातातच फायली
समाजकल्याण विभागाच्या जावक नोंदवहीतील नोंदीनुसार १ ऑक्टोबर रोजी फायली अर्थ विभागात पाठविण्यात आल्या; मात्र अर्थ विभागातून त्या फायली समाजकल्याणकडे परत पाठविल्याची नोंदही त्या विभागात नाही. त्यातच फायली कर्मचार्यांच्या हातात कशा देण्यात आल्या, असा प्रश्नही मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी नोटीसमध्ये विचारला आहे.
सर्वाधिक अनुदान पिंजरच्या कपिलेश्वर वसतिगृहाला
सुरुवातीला ११ वसतिगृहांना वाटप झाल्याची माहिती देण्यात आली. त्यामध्ये आणखी तीन वसतिगृहे आहेत. त्यापैकी पिंजर येथील कपिलेश्वर वसतिगृहाला सर्वाधिक अनुदानाची रक्कम देण्यात आली आहे. सोबतच संत गाडगेबाबा कानडी व राजनखेड येथील रुद्रायणीदेवी वसतिगृहाचा समावेश आहे.