उपाशी राहू नका, उधारीवर जेवा - दिलदार हॉटेल मालक
By Admin | Published: November 11, 2016 01:41 PM2016-11-11T13:41:55+5:302016-11-11T15:37:56+5:30
अकोल्यातील बाळापूरमधील महामार्गावर 'मराठा हॉटेल'ने 500, 1000 सुट्टे नसतील तर प्रवाशांना उधारीवर जेवण करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे
ऑनलाइन लोकमत
बाळापूर(अकोला), दि. 11 - केंद्र सरकारने चलनातून 500, 1000 रुपयांच्या नोटा रद्द केल्यामुळे लांब पल्ल्यांचा प्रवास करणा-या नागरिकांपुढे मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण झाली आहे. विशेषतः त्यांची जेवणाची मोठी गैरसोय होत आहे. खिशात पैसे असूनही प्रवाशांवर उपासमारीची वेळ येत आहे. कारण हॉटेल मालक 500, 1000 रुपयांच्या नोटा स्वीकारत नाहीत. शिवाय, सुट्टे पैसे मिळणेही कठीण झाले आहे.
मात्र, जिल्ह्यातील बाळापूरमधील महामार्गावरील 'मराठा हॉटेल' याला अपवाद ठरले आहे. प्रवासी उपाशी राहू नयेत, यासाठी हॉटेल मालक अॅड. मुरलीधर राऊत यांनी प्रवाशांना उधारीवर जेवण करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. '500, 1000 रुपयांच्या नोटा असतील तर चिंता करू नका, जेवण करुन जा. पुढच्या वेळी याल तेव्हा पैसे द्या !',असे भलेमोठे पोस्टरच हॉटेलबाहेर लावण्यात आले आहे. पारस फाट्याजवळ असलेले या हॉटेलमध्ये सर्व ग्राहक पोट भरुन जेवताना दिसत आहे.
जिथे ओळखीच्या ग्राहकांना सुटे पैसे देण्यास, उधार देण्यास हॉटेल मालक स्पष्ट नकार देत असतानाच, मराठा हॉटेलचे मालक अनोळखी प्रवाशांना 'पुन्हा याल तर पैसे द्या' या अटीनुसार उधारीवर जेवण करू देत आहेत. त्यामुळे मराठा हॉटेल मालकाच्या या दिलदारपणाचे सर्वजण कौतुक करत आहेत.