निवडणूक खर्च सादर न करणे भोवले
By admin | Published: October 12, 2014 01:10 AM2014-10-12T01:10:31+5:302014-10-12T01:10:31+5:30
चार उमेदवारांनी निवडणूक खर्चाचे विवरणपत्र सादर न केल्यामुळे आकोट पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल.
आकोट (अकोला) : आकोट विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविणार्या चार उमेदवारांनी निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून निवडणूक विषयक खर्चाचे विवरणपत्र सादर न केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध आकोट पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. निवडणूक खर्च विवरणपत्र सादर करण्याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी ६ व ९ ऑक्टोबर रोजी उमेदवारांना लेखी पत्राद्वारे कळविले होते. परंतु त्यांनी खर्चाचे विवरणपत्र सादर न केल्यामुळे लोकप्रतिनिधित्व कायदा १९५१ मधील तरतुदीचे उल्लंघन झाल्याने अपक्ष उमेदवार शरीफ सिकंदर, डॉ. उमेश नवलकार, गजानन पुंडकर, बहुजन पक्षाचे उमेदवार विनोद डाबेराव यांच्याविरुद्ध पथकप्रमुख धुर्वे यांनी फिर्याद दाखल केली. फिर्यादीवरून आकोट पोलिसांनी चार उमेदवारांविरुद्ध गुन्हा दाखल केला.