कांदा भाववाढीचा फायदा शेतक-यांना नव्हे व्यापा-यांनाच!
By admin | Published: August 26, 2015 12:56 AM2015-08-26T00:56:54+5:302015-08-26T00:56:54+5:30
शेतक-यांकडे कांदाच नाही.
विवेक चांदूरकर /अकोला : सध्या देशात कांद्याच्या भाववाढीवरून रणकंदन माजले असून, या भाववाढीमुळे शेतकर्यांना फायदा होत असेल तर विरोध का होत असल्याचे आरोप प्रत्यारोपही होत आहेत. मात्र, शेतकर्यांनी केवळ हजार ते पंधराशे रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे कांद्याची विक्री केली असून, चार ते साडे चार हजार रुपये प्रतिक्विंटलचा मलिदा व्यापारी लाटत आहेत. या भाववाढीचा शेतकर्यांना कवडीचाही फायदा होत नसून, व्यापारी मालामाल होत असल्याचे चित्र आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कांद्याच्या भावात वाढ झाली. सध्या कांदा ७0 रुपये किलो बाजारपेठेत ग्राहकांना मिळत आहे. या भाववाढीमुळे मोठय़ा प्रमाणात ग्राहकांकडून ओरड केल्या जात आहे. दुसरीकडे शेतकरी नेते व शेतकर्यांचे कैवारी असल्याचे भासविणारे नेते कांद्याचे भाव वाढल्यामुळे शेतकर्यांना फायदा होत असेल तर आकांडतांडव कशासाठी, असा आरोप करीत आहेत. कांदा उत्पादन घेणारे ९0 टक्के शेतकरी कांद्याची साठवणूक करीत नाही. कांद्याची साठवणूक केली तर कांद्याला सड लागते. तसेच कांदा सुकल्यानंतर त्याचे वजन कमी होते. कांद्याची साठवणूक करण्यासाठी उच्च दर्जाचे शीतगृह, गोडाऊन, कांदाचाळ आवश्यक असते. शेतकर्यांकडे याची व्यवस्था नसल्यामुळे कांद्याची साठवणूक करण्यात येत नाही. दरवर्षी कांद्याच्या भावात वाढ होत असल्यामुळे व्यापारी कांद्याची मोठय़ा प्रमाणात साठवणूक करतात. त्यामुळे बाजारपेठेत टंचाई निर्माण होते व आपोआपच भाववाढ होते. त्यानंतर व्यापारी चढय़ा भावाने कांद्याची विक्री करतात व मलिदा लाटतात.
राज्यात कांद्याची पेरणी खरीप, रब्बी व उन्हाळी अशा तीन हंगामात केली जाते. विदर्भात प्रामुख्याने रब्बी हंगामात तर नाशिकमध्ये तीनही हंगामात कांद्याचे उत्पादन घेतल्या जाते. गतवर्षी जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात अवकाळी पाऊस व गारपीट झाली. त्यामुळे उत्पादनात घट झाली. याचे नुकसान तर शेतकर्यांना सोसावे लागले; मात्र कांद्याला हजार ते पंधराशे रुपये क्विंटलनेच भाव मिळाला. व्यापार्यांना मात्र प्रतिक्विंटल ४ हजार रुपये नफा मिळत आहे.
*सोशल मीडियावर 'कांदा वॉर'
सध्या सोशल मीडियावर कांद्याच्या भाववाढीवरून अनेक आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. कांद्याचे महत्त्व अधोरेखित करणारे छायाचित्र व व्हिडिओ मोठय़ा प्रमाणात लाइक व शेअर करण्यात येत आहे. तर दुसरीकडे हा शेतकर्यांचा अपमान असून, यामुळे त्यांच्या भावना दुखावल्या जात असल्याचा आरोपही होत आहे.