देशातील राजकीय वातावरणाची चिंता करू नका! - रावसाहेब दानवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 12:59 PM2018-12-26T12:59:31+5:302018-12-26T12:59:55+5:30
देशातील राजकीय वातावरणाची चिंता न करता आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आवाहन मंगळवारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले.
अकोला: सत्तेच्या उण्यापुऱ्या साडेचार वर्षांच्या कालावधीत भाजपाने देशात विकास कामांची मुहूर्तमेढ रोवली. देशात जातीयवादाला थारा न दिल्यामुळेच जातीय दंगली भडकल्या नाहीत, याची पुरेपूर जाण सर्वसामान्य जनतेला आहे. त्यामुळे देशातील राजकीय वातावरणाची चिंता न करता आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आवाहन मंगळवारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले. विकास कामांच्या बळावरच देशात पुन्हा भाजपप्रणीत एनडीए सरकार विराजमान होणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
रामदासपेठस्थित मराठा मंडळ मंगल कार्यालयात भाजपाच्या निवडणूक संचालन समिती आघाडी प्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात होते तर व्यासपीठावर प्रदेश संघटन सरचिटणीस विजय पुराणिक, विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठीकर, खा. अॅड. संजय धोत्रे, ना. डॉ. रणजित पाटील, आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर, महापौर विजय अग्रवाल, आ. हरीश पिंपळे, माजी आ. विजयराव जाधव, महानगराध्यक्ष किशोर पाटील मांगटे, उपमहापौर वैशाली शेळके आदी विराजमान होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साडेचार वर्षांच्या कालावधीत केलेल्या विकास कामांची काँग्रेससह विरोधकांनी धास्ती घेतली आहे. भाजपला कोणत्याही परिस्थितीत सत्तेवरून खाली खेचण्यासाठी काँग्रेसने देशाला अस्थिर करण्याचे कारस्थान रचल्याचा आरोप यावेळी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला. सर्वसामान्य नागरिकांमध्ये जाणीवपूर्वक भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला आहे. यावर मात करण्यासाठी पक्ष संघटन महत्त्वाचे असून, सर्वांनी एकदिलाने काम करा, देशातील राजकीय वातावरणाची चिंता करू नका, असे सांगत रावसाहेब दानवे यांनी देशात पुन्हा एकदा भाजपप्रणीत एनडीए सरकार विराजमान होणार असल्याचे स्पष्ट केले.