...अन् रुग्णसेवा देतानाच डॉक्टरांची प्रकृती बिघडली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 01:56 PM2020-03-01T13:56:54+5:302020-03-01T13:57:03+5:30
रुग्णसेवा देताना एका वैद्यकीय अधिकाऱ्याची अचानक प्रकृती बिघडल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास सर्वोपचार रुग्णालयात घडला.
अकोला : सर्वोपचार रुग्णालयातील अस्थिव्यंगशास्त्र विभागाचा भार केवळ दोन डॉक्टरांवर आला आहे. रुग्णसेवेचा अतिरिक्त बोझा अन् प्रशासनाच्या अजब अटींमुळे वैद्यकीय अधिकारी मानसिक तणावात काम करत आहेत. अशातच रुग्णसेवा देताना एका वैद्यकीय अधिकाऱ्याची अचानक प्रकृती बिघडल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास सर्वोपचार रुग्णालयात घडला.
चार महिन्यांच्या थकीत वेतनासाठी आंदोलन केल्यामुळे सर्वोपचार रुग्णालयातील अस्थिव्यंगशास्त्र विभागातील सात निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा एकाच वेळी थांबविण्यात आली. सातही डॉक्टर एकाच विभागातील असल्याने येथील रुग्णसेवा विस्कळीत झाली आहे. विभागात केवळ दोनच निवासी डॉक्टर शिल्लक राहणार असून, त्यांच्यावर बाह्यरुग्ण विभाग, आपत्कालीन विभागासह अस्थिव्यंग वार्डातील ५०० पेक्षा जास्त रुग्णांचा भार आला आहे. त्यामुळे गंभीर रुग्णांना थेट नागपूरला रेफर केले जात आहे. दरम्यान, शनिवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास रुग्णसेवा देताना डॉ. अनुराग गुप्ता यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी अधिष्ठाता डॉ. शिवहरी घोरपडे यांना विचारले असता, हा प्रकार त्यांना माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले.
सरकारी डॉक्टरांवर खासगीत उपचार
सर्वोपचार रुग्णालयात रुग्णसेवा देताना अचानक प्रकृती बिघडल्याने डॉ. गुप्ता यांच्यावर तत्काळ खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. डॉ. गुप्ता हे स्वत: शासकीय रुग्णालयात सेवा देत असून, त्यांनाच येथे उपचार मिळत नसेल, तर सर्वसामान्य रुग्णांवर काय उपचार होत असेल, हादेखील संशोधनाचाच विषय आहे.
प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनाही मानसिक ताण!
सर्वोपचार रुग्णालयाचा बहुतांश कारभार हा प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या भरवशावर सुरू आहे. निवासी डॉक्टरांची सेवा अचानक थांबवणे, सेवेत कायम राहण्यासाठी रुग्णालय प्रशासनाच्या जाचक अटी अन् वाढती रुग्णसंख्या यामुळे डॉक्टरांमध्ये मानसिक तणाव वाढत आहे. त्याचा सर्वाधिक फटका हा प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनाही बसत आहे.