डॉक्टरला शिवीगाळ ; माय-लेकास कारावास
By Admin | Published: June 18, 2017 02:08 AM2017-06-18T02:08:36+5:302017-06-18T02:08:36+5:30
जिल्हा स्त्री रुग्णालयातील एका वैद्यकीय अधिकार्यासह त्यांच्या सहकार्यांना शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी देणार्या मायलेकास न्यायालयाने सहा महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: जिल्हा स्त्री रुग्णालयातील एका वैद्यकीय अधिकार्यासह त्यांच्या सहकार्यांना शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी देणार्या मायलेकास प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयाने शनिवारी सहा महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. सोबतच दंड व दंड न भरल्यास अतिरिक्त शिक्षेचेही आदेश दिले.
डॉ. सूचिता सुभाष राठोड या कर्तव्यावर असताना त्यांनी शीतल संजय राऊत यांची २९ जून २0१२ रोजी रात्री साडेअकरा वाजता प्रसूती केली. यावेळी शीतल राऊत यांची आई शां ताबाई बागडे व त्यांचा मुलगा विक्की ऊर्फ अर्जुन रवींद्र बागडे हे रुग्णालयात उपस्थित होते. त्यानंतर शांताबाई बागडे यांनी क्षुल्लक कारणावरून डॉ. सुचिता राठोड यांच्याशी वाद घालत त्यांच्या कक्षात जबरदस्ती घुसल्या. त्यांना अश्लील शिवीगाळ केली. यावेळी बागडे यांचा मुलगा विक्की ऊर्फ अर्जुन बागडे याने दरवाजे आणि खिडक्यांवर दगड फेकल्याने काचा फोडून आर्थिक नुकसान केले. डॉ. सुचिता राठोड यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. जमादार शशिकांत गायकवाड यांनी या प्रकरणाचा तपास पूर्ण केला. सहावे प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी श्वेता चांडक यांनी सरकार पक्षातर्फे सात साक्षीदार तपासले. गुन्हा सिद्ध झाल्यानंतर अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी बागडे मायलेकास तीन महिन्यांचा सश्रम कारावास, ५00 रुपये दंड व दंड न भरल्यास पंधरा दिवसांची शिक्षा, तसेच जीवे मारण्याची धमकी देणे व जबरदस्तीने कार्यालयात घुसणे या कलमान्वये प्रत्येकी सहा महिन्यांचा सश्रम कारावास, दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिन्यांची साध्या कैदेचे आदेश दिले. दंडातील दोन हजार रुपये डॉ. राठोड व साक्षीदार शोभा श्यामराव जाधव यांना नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. सरकार पक्षातर्फे अँड. जी. एल. इंगोले यांनी काम पाहिले.