डॉक्टरांच्या माध्यमातून रुग्णांना दिलासा देण्याचे सत्कार्य - संचेती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2016 02:39 AM2016-03-07T02:39:10+5:302016-03-07T02:39:10+5:30
महाआरोग्य शिबिराचा समारोप, पालकमंत्र्यांनी केला ज्येष्ठ शल्यचिकित्सकांचा सन्मान.
अकोला: महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून पश्चिम विदर्भातील गोरगरीब रुग्णांना दिलासा मिळाला आहे. त्यांच्या विविध आजारांवर या ठिकाणी उपचार करण्यात आले. शासकीय डॉक्टरांसोबतच शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांनी शिबिरात सेवा देऊन एक प्रकारचे सत्कार्य केले आहे. कार्याचा कधीही सन्मान होत नाही; सन्मान हा नेहमी सत्कार्याचा होतो. या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून खर्या अर्थाने सत्कार्य घडले आहे, असे प्रतिपादन मलकापूरचे आमदार चैनसुख संचेती यांनी येथे केले.
महाआरोग्य रोगनिदान व उपचार शिबिराच्या समारोपप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील होते. व्यासपीठावर जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे सीईओ एम. देवेंदर सिंह, आरोग्य उपसंचालक डॉ. अविनाश लव्हाळे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते, उपअधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, डॉ. किशोर मालोकार, डॉ. अशोक ओळंबे, दीपक मायी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनंत डवंगे, डॉ. आर. एन. भांबुरकर, डॉ. आरती कुलवाल, डॉ. नरेश बजाज आदींची उपस्थिती होती. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सर्वांच्या सहकार्यामुळे शिबिर यशस्वी झाले. शहरातील खासगी रुग्णालयांमधील डॉक्टरांनी दोन दिवस त्यांचे दवाखाने, रुग्णालये बंद ठेवून पूर्णवेळ येथे सेवा दिली.
भविष्यात सुद्धा त्यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमामध्ये शहरातील ज्येष्ठ शल्य चिकित्सक डॉ. नानासाहेब चौधरी, डॉ. आर.एन. भांबुरकर, डॉ. एन. के. माहेश्वरी, डॉ. आर.बी. हेडा, डॉ. कराळे यांचा शाल व श्रीफळ देऊन पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, आमदार चैनसुख संचेती यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यासोबतच डॉ. राजेश कार्यकर्ते, डॉ. कुसुमाकर घोरपडे, डॉ. डवंगे, प्रकाश सावल, संदीप पुंडकर, प्रभजितसिंह बछेर, संत निरंकारी सेवादल यांसह शिबिरामध्ये योगदान देणार्या सामाजिक, धार्मिक संस्था पदाधिकार्यांचा पालकमंत्र्यांनी सत्कार केला. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन डॉ. हर्षवर्धन मालोकार यांनी केले.