कुत्र्यांनी केली काळविटाची शिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 01:46 PM2021-05-28T13:46:02+5:302021-05-28T13:50:04+5:30
Murtijapur News : कुत्र्यांनी पाठीवर व मांडीवर लचके तोडले. भितीने त्याला हृदय विकाराचा झटका आला त्यात त्याचा मृत्यू झाला असे वनविभागाचे म्हणणे आहे.
मूर्तिजापूर : येथील राष्ट्रीय महामार्गावरील वखार महामंडळाच्या धान्य गोदामाजवळ कुत्र्यांनी एका काळविटाचा पाठलाग करुन त्याची शिकार केल्याची घटना शुक्रवारी पहाटे ६ वाजताच्या दरम्यान घडली.
जंगलात पाणी नसल्याने पाण्याच्या शोधात वन्य प्राणी लोकवस्तीच्या दिशेने येत आहेत. २८ मे रोजी राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल परीसरात पाण्याच्या शोधात आलेल्या काळविटचा कुत्र्यांनी पाठलाग करुन त्याची शिकार केली. घटनेची माहिती मिळताच सर्पमित्र संजय दोड यांनी काळविटाला वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात काळविट गंभीररीत्या जखमी झाल्याने सर्पमित्र संजय दोड यांना काळविटचे प्राण वाचविण्यात अपयश आले. कुत्र्यांनी पाठीवर व मांडीवर लचके तोडले. भितीने त्याला हृदय विकाराचा झटका आला. त्यात त्याचा मृत्यू झाला असे वनविभागाचे म्हणणे आहे. याबाबतची माहिती संजय दोड यांनी वनविभागाला देऊन कर्मचाऱ्यांनी पंचनामा करुन पशुवैद्यकीय डॉक्टरच्या मदतीने शवविच्छेदन करुन मृत काळविटाला दफन करण्यात आले असल्याची माहिती वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिली.