रिसोड तालुक्यात देशी दारूची द्वारपोच सेवा!
By admin | Published: February 13, 2016 01:58 AM2016-02-13T01:58:43+5:302016-02-13T01:58:43+5:30
पोलीस प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क विभाग झोपेत; महिन्याकाठी लाखो रुपयांची उलाढाल.
शीतल धांडे / रिसोड: पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाकावर टिच्चून रिसोड शहरातून मोटारसायकलवर हजारो लीटर दारूची 'पार्सल' ग्रामीण भागात पोचविली जात आहे. विशेष म्हणजे शहरातील प्रत्येक चौकात पोलीस तैनात असतानाही हा गोरखधंदा सुरू असल्याने 'अर्थ'पूर्ण उलाढाल समोर येत आहे.
शहरातील परवानाधारक देशी दारू विक्रेत्याच्या स्वतंत्र यंत्रणेमार्फत तालुक्यातील प्रत्येक गाव, वस्ती, तांड्यात द्वारपोच देशी दारूची 'पार्सल' दिल्या जात आहे. परिणामी प्रत्येक गावात मद्यपींना मागेल त्यावेळी सहज देशी-विदेशी दारू उपलब्ध होत आहे. यामुळे दिवसागणिक ग्रामीण भागातील क्राइमचा आलेखसुद्धा उंचावला असल्याचे दिसून येते. सहजरीत्या उपलब्ध होत असलेल्या दारूच्या आहारी युवक वर्ग मोठय़ा प्रमाणात गेल्याचे प्रामुख्याने दिसून येते. तर दिवसभर मोलमजुरी करून काबडकष्टाची तुटपुंजी कमाई अध्र्यापेक्षा अधिक दारू विक्रेत्याच्या घशात जात आहे. दारूमुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले असून, काही कुटुंबात कौटुंबिक कलहसुद्धा मोठय़ा प्रमाणात वाढले आहे. सूर्योदयाच्या पहिल्या किरणोत्सवापासून शहरातील दारू विक्रेत्यांच्या दुकानातून २0 ते २0 वर्षे वयोगटातील युवक दिवसभर दारूच्या पेट्या दुचाकीवरून राजरोसपणे ग्रामीण भागात पोहचवून देतात. या मोबदल्यात त्यांना ठरावीक रक्कम दिली जाते. एका पेटीमागे ३५0 ते ४00 रुपये ठोक विक्री वगळता मार्जीन ठेवून ग्रामीण भागातील अवैध दारू विक्रेत्याला दारूची पेटी रोख स्वरूपात दिल्या जाते, असे विश्वसनीय वृत्त आहे. दिवसभरातून अंदाजे शंभरच्या वर देशी दारू पेट्यांची विक्री केल्या जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यातून महिन्याकाठी लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याचे सांगितले जाते.