पातुर तालुक्यातील अनेक पंचायतींवर आमदार गटाचं प्राबल्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:21 AM2021-01-19T04:21:37+5:302021-01-19T04:21:37+5:30
आमदार नितीन देशमुख यांच्या ग्रामपातळीवरील विविध महाविकास आघाडी ग्रामविकास आघाड्यांना बहुमत प्राप्त झाले आहे. शिरला, सस्ती, चतारी, चान्नी चांगेफळ, ...
आमदार नितीन देशमुख यांच्या ग्रामपातळीवरील विविध महाविकास आघाडी ग्रामविकास आघाड्यांना बहुमत प्राप्त झाले आहे.
शिरला, सस्ती, चतारी, चान्नी चांगेफळ, राहेर, सायवणी याठिकाणी प्राबल्य दिसून आले.
आलेगाव ग्रामपंचायतीवर 17 पैकी 15 जागांवर माजी जिल्हा परिषद सदस्य रमण जैन यांच्या ग्रामविकास आघाडीला लोकांनी पसंती दिली.
तालुक्यातील लक्षवेधी ग्रामपंचायत चरणगावात विद्यमान जिल्हा परिषद सदस्य विनोद देशमुख गटाचे तीन, माजी सभापती प्रमोद देशमुख गटाचे तीन, शिरसागर गटाचे तीन याप्रमाणे निकाल लागले. त्यामुळे ही ग्रामपंचायत त्रिशंकू झाली आहे. उर्वरित पातूर तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये गावपातळीवरील ग्रामविकास पॅनलला यश मिळाले. शिर्ला ग्रामपंचायतमध्ये अनेक पहिलवानांना संधी दिली आहे.
पातूर तालुक्यात २२१ जागांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली असून, आता ग्रामपंचायतीच्या राजकारणात निकाल समोर आल्यानंतर खऱ्या अर्थाने रंगत आली आहे. अत्यंत चुरशीच्या व प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ग्रा. पं. निवडणुकीत आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, तसेच राजकीय पुढाऱ्यांनी आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली. तालुक्यात आणि ठिकाणी दुरंगी, तिरंगी, तर काही गावांमध्ये चौरंगी लढत होती, तर काही उमेदवारांनी आपलाच विजय नक्की असल्याची खात्री होती; परंतु निकाल अनपेक्षित आले असून, मतदारांनी आपला कौल तरुण उमेदवारांना देऊन ‘गाव करी ते राव न करी’ या उक्तीला खऱ्या अर्थाने सत्यात उतरविले. त्यामुळे जुन्या-जाणत्या प्रस्थापितांना धक्का पोहोचला आहे.
दरम्यान, मतमोजणीचा निकाल उशिरा प्राप्त झाल्यामुळे अनेक गावांमधील स्थिती स्पष्ट झाली नाही.