धर्मार्थ रुग्णालयाच्या बांधकामासाठी सहा लाखांची देणगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:41 AM2021-09-02T04:41:37+5:302021-09-02T04:41:37+5:30
बोरगाव मंजू : कोरोनाच्या संकटकाळात नागरिकांना अनेक हाल सोसावे लागले आहेत. गावात आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, या हेतूने येथील ...
बोरगाव मंजू : कोरोनाच्या संकटकाळात नागरिकांना अनेक हाल सोसावे लागले आहेत. गावात आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, या हेतूने येथील संत गजानन महाराज मंदिर संस्थानमार्फत धर्मार्थ रुग्णालयाचे बांधकाम करण्यात येत आहे. या स्तुत्य उपक्रमात खारीचा वाटा उचलीत डॉ. केशव काळे यांनी मुला, मुलींचा वाढदिवस साजरा न करता रुग्णालयाच्या बांधकामासाठी तब्बल सहा लाखांची देणगी दिली आहे.
डॉ. केशव भाऊराव काळे यांनी मुला, मुलीचा वाढदिवस साजरा न करता दोन लाख रुपये, तर यापूर्वी चार लाखांची देणगी दिली आहे. त्यामुळे येथील धर्मार्थ रुग्णालयाचे काम प्रगतिपथावर असून, पूर्णत्वास जात आहे. डॉ. काळे यांना दोन अपत्ये, कन्या डॉ. लक्ष्मी, मुलगा डॉ. वेदांत या दोघांच्या वाढदिवसानिमित्त कुठेही बडेजाव न करता दोन लाख रुपयांची मदत केली आहे. सेवा समितीचे सचिव नरेंद्र निवाने, कोषाध्यक्ष गोपाल दळवी यांच्याकडे देणगी सुपूर्द करीत दातृत्वाचा परिचय दिला. डॉ. केशव काळे यांच्या संकल्पनेतून सामान्यांच्या आरोग्याच्या हिताचे धर्मार्थ रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. येथील लक्ष्मी नगर स्थित उभारण्यात येणाऱ्या धर्मार्थ रुग्णालयासाठी अनेक दानशूरांनी मदत दिली आहे.
-----------------------
सर्वसामान्यांना मिळणार आरोग्यसेवा!
कोरोनाच्या संकटकाळात सर्वसामान्यांचे हाल झाले आहेत. अनेकांना आरोग्य सुविधा मिळाल्याच नसल्याने प्राणास मुकावे लागले आहे. गावातील नागरिकांना आरोग्य सेवा मिळावी या हेतूने लक्ष्मी नगरात संत गजानन महाराज मंदिर संस्थानमार्फत धर्मार्थ रुग्णालयाचे काम सुरू आहे. यासाठी डॉ. केशव काळे यांनी मदत करून सामाजिक व दातृत्वाचा परिचय दिला.