तेरवीचा खर्च टाळून शाळेला देणगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2017 01:53 AM2017-07-03T01:53:18+5:302017-07-03T01:53:18+5:30
गोपालखेडच्या सरंपचाने घालून दिला आदर्श : मंदिरालाही दिला निधी
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : पूर्वापार चालत आलेल्या तेरवी, दसवा यासारख्या रूढी परंपरांना फाटा देत तालुक्यातील गोपालखेड येथील सरपंचाने तेरवीचा खर्च टाळून गावातील शाळा डिजिटल करण्यासाठी देणगी देऊन नवा आदर्श घालून दिला आहे. याशिवाय गावातील हनुमान मंदिराच्या बांधकामासाठीही त्यांनी देणगी दिली आहे.
गोपालखेड येथील सरपंच प्रशांत देवीदासराव मोडक यांच्या आई निर्मलाबाई मोडक यांचे गत महिन्यात वृद्धापकाळाने निधन झाले. अंत्यसंस्कार आटोपल्यानंतर मोडक परिवाराने निर्मलाबाई यांची तेरवी मोठ्या प्रमाणात न करता त्यावर होणारा खर्च गावातील शाळेला निधी देण्याचा निर्णय घेतला. यानुसार मोडक कुटुंबीयांनी घरगुती कार्यक्रम आटोपून तेरवीवर होणाऱ्या खर्चातून स्व. निर्मलाबाई यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गोपालखेड जिल्हा परिषद शाळेत डिजिटल क्लासरूम करण्यासाठी २१ हजार रुपयांची देणगी दिली. याशिवाय ११ हजार रुपये हनुमान मंदिराला देणगी म्हणून दिले. शाळेच्या पहिल्या दिवशी २७ जून रोजी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रदीप देशमुख यांच्या हस्ते २१ हजार रुपयांचा निधी मुख्याध्यापिका जयश्री जोशी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
हा निधी व उर्वरित रक्कम लोकवर्गणीतून उभी करून शाळेत अद्ययावत डिजिटल क्लासरूम तयार करण्यात येईल. सरपंच प्रशांत मोडक व त्यांचे वडील देवीदासराव मोडक यांच्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.