मंडप डेकोरेशन मालकांवर गुन्हे दाखल करू नये!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:23 AM2021-02-25T04:23:22+5:302021-02-25T04:23:22+5:30
तेल्हारा : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनामार्फत प्रयत्न केले जात असून, पुन्हा लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे लग्नसमारंभाला अटी ...
तेल्हारा : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनामार्फत प्रयत्न केले जात असून, पुन्हा लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे लग्नसमारंभाला अटी व शर्तीनुसार परवानगी देण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास मंगल कार्यालयाचे मालक, मंडप डेकोरेशन, आचारी व बॅन्ड पथकाच्या मालकांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. मंडप, डेकोरेशन आदी मालकांचा करार आयोजकासोबत असतो, त्यामुळे लग्नसमारंभात मंडप, डेकोरेशन, आचारी, बॅन्ड पथकाच्या मालकावर गुन्हे दाखल करण्यात येऊ नये, अशी मागणी तेल्हारा तालुका मंडप, डेकोरेशन बिछायत, लाईट साऊंंड असोसिएशनने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लघु व्यावसायिक संकटात सापडले आहेत. अनेक खासगी व्यावसायिकांनी व्यवसाय बंद केले आहेत. अशातच लग्न समारंभावर मंडप डेकोरेशन, आचारी, बॅन्ड व्यावसायिक यांचे आर्थिक गणित अवलंबून असते. त्यांच्यावरच दंडात्मक कारवाईचे फार मोठे संकट उभे राहिले आहे. लग्न समारंभात जास्त उपस्थित असल्यास आयोजकाला सोडून व्यावसायिकांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यामुळे अशा जाचक अटीतून वगळण्यात यावे व मंडप, डेकोरेशन व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करू नये, अशी मागणी करीत तालुका मंडप डेकोरेशन बिछायत, लाईट साऊंड असोसिएशनने तहसीलदारांना निवेदन दिले आहे. निवेदनावर अध्यक्ष दीपक वैष्णव, उपाध्यक्ष धीरज बजाज, सचिव विजय मानके यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.