मुंबईला ड्युटी नको रे बाबा! एसटीच्या चालक-वाहकांचा नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:19 AM2021-04-01T04:19:08+5:302021-04-01T04:19:08+5:30
मुंबईला बेस्टच्या सेवेसाठी दरवर्षी राज्यभरातील महामंडळाचे चालक-वाहक पाठविले जातात. यामध्ये यावर्षी अकोला विभागातून ५० चालक आणि ५० वाहक अशा ...
मुंबईला बेस्टच्या सेवेसाठी दरवर्षी राज्यभरातील महामंडळाचे चालक-वाहक पाठविले जातात. यामध्ये यावर्षी अकोला विभागातून ५० चालक आणि ५० वाहक अशा बॅचेस करून पाठविले जात आहे. पहिली बॅच ड्युटी करून परत आली असून दुसरी बॅच मुंबईला कार्यरत असल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले. यापैकी काही चालक व वाहक पॉझिटिव्ह आले होते. या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनाही मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि मानसिक त्रास झाला होता. सध्या मुंबई, ठाणे येथे कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे चालक-वाहकांच्या मनामध्ये मोठी भीती आहे. परिणामी, यामुळे अनेक कर्मचाऱ्यांचे आरोग्य खालावले आहे. सुरुवातीपासूनच मुंबईला जाण्यासाठी या कर्मचाऱ्यांचा विरोध होत आहे. आता तर आठऐवजी १५ दिवस सेवा बजाविण्याचे आदेश महामंडळाने दिले आहेत. कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळेच चालक-वाहक मुंबईची ड्युटी म्हटले की, नकोच म्हणत आहेत. अनेक जण मुंबईची ड्युटी रद्दसाठी अनेक फंडे शोधून काढत आहेत. एसटी महामंडळ प्रशासनातर्फे पुढील काही दिवस १०० चालक-वाहकांना मुंबईला पाठविले जाणार आहे. प्रशासनाच्या या निर्णयास कर्मचारी संघटनेकडून तीव्र विरोध होत आहे.
--कोट--
मुंबईला ड्युटी करताना चालक-वाहकांना स्वत: काळजी घेऊन काम करावे लागत आहे. महामंडळाकडून जेवणाची व झोपण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. काही कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने चिंता होत आहे.
चालक, अकोला आगार
--कोट--
गेल्यावर्षी राज्यातील काही वाहक-चालक मुंबईला ड्युटीवर गेल्यावर योग्य व्यवस्था मिळाली नव्हती. आता भत्ता मिळत आहे; मात्र सॅनिटायझर व मास्कचा पुरवठा होत नाही. खिशातून खर्च करून तयारीत रहावे लागते.
वाहक, अकोला आगार
--कोट---
मुंबईहून आल्यानंतर काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच मुंबईतील वातावरणाचाही इतर कर्मचाऱ्यांना त्रास होऊन आरोग्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात यावे.
रुपम वाघमारे, विभागीय सचिव, महाराष्ट्र एसटी संघटना