केवळ कागदोपत्री कार्यवाही नको; प्रत्येक शाळेत उपाययोजना करा

By संतोष येलकर | Published: August 24, 2024 02:50 PM2024-08-24T14:50:41+5:302024-08-24T14:52:26+5:30

बाळापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या एका शाळेतील सहा विद्यार्थिनींचा लैंगिक छळ करण्यात आल्याची घटना शुक्रवारी जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत चांगलीच गाजली.

Don't just do paperwork; Take action in every school in akola | केवळ कागदोपत्री कार्यवाही नको; प्रत्येक शाळेत उपाययोजना करा

केवळ कागदोपत्री कार्यवाही नको; प्रत्येक शाळेत उपाययोजना करा

अकोला: बाळापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या एका शाळेतील सहा विद्यार्थिनींचा लैंगिक छळ करण्यात आल्याची घटना शुक्रवारी जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत चांगलीच गाजली. अशी घटना पुन्हा होणार नाही, यासाठी केवळ कागदोपत्री कार्यवाही न करता जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत आवश्यक असलेल्या उपाययोजना करण्याचे निर्देश शिक्षण विभागाला या सभेत देण्यात आले.

जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता अढाऊ यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या सभेला मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, उपाध्यक्ष सुनील फाटकर, समाजकल्याण सभापती आम्रपाली खंडारे, शिक्षण व आरोग्य सभापती माया नाइक, महिला बालकल्याण सभापती रिजवाना परवीन, कृषी व पशुसंवर्धन सभापती योगिता रोकडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, समिती सदस्य ज्ञानेश्वर सुलताने, गोपाल दातकर, डाॅ.प्रशांत अढाऊ, गजानन पुंडकर, मीना बावणे, चंद्रशेखर चिंचोळकर आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

किती शाळांमध्ये ‘सखी सावित्री’ समित्या?

जिल्ह्यातील किती जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘सखी सावित्री’ समित्या गठित करण्यात आल्या आणि गठित करण्यात आलेल्या किती समित्यांच्या बैठका घेण्यात आल्या, अशी विचारणा सदस्य डाॅ. प्रशांत अढाऊ यांनी सभेत केली. समित्या आणि बैठकांची माहिती कागदोपत्री असल्याचा आरोप त्यांनी केला. कागदोपत्री कार्यवाही नको, प्रत्यक्ष उपाययोजना करण्याची मागणी सदस्य चंद्रशेखर चिंचोळकर यांनी केली. शाळांमध्ये ‘सखी सावित्री’ समित्या गठित झाल्या असत्या, तर जिल्ह्यात अशा घटना घडल्या नसत्या, असा आरोप सदस्य गजानन पुंडकर यांनी केला.

प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांसाठी ‘गुड टच बॅड टच’ कार्यशाळा घ्या 

बाळापूर तालुक्यातील एका शाळेतील संबंधित घटनेची तक्रार तीन दिवसांपूर्वीच (१७ ऑगस्ट रोजी) करण्यात आली होती. तेव्हापासून शिक्षण विभागाची यंत्रणा काय करीत होती, अशी विचारणा करीत, यापुढे अशी घटना होऊ नये, यासाठी प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांसाठी ‘गुड टच बॅड टच’ कार्यशाळा घेण्याची सूचना सदस्य चंद्रशेखर चिंचोळकर यांनी मांडली.

यंत्रणांची बैठक घेऊन उपाययोजना करा 

पोलिस आणि संंबंधित यंत्रणांची बैठक घेऊन, जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत उपाययोजना करण्याची सूचना सदस्य ज्ञानेश्वर सुलताने यांनी मांडली. त्यानुषंगाने शिक्षण विभागाने यासंदर्भात तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता अढाऊ यांनी दिले.
 

Web Title: Don't just do paperwork; Take action in every school in akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.