मनपाच्या शाळेला बेघरांचा निवारा बनवू नका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:13 AM2021-06-19T04:13:59+5:302021-06-19T04:13:59+5:30
शहरातील बेघर व्यक्तींसाठी महापालिका प्रशासनाने अकाेटफैल पाेलिस ठाण्यासमाेरील मनपाच्या हिंदी शाळा क्रमांक ३ मध्ये तात्पुरता निवारा उभारला आहे. स्वयंसेवी ...
शहरातील बेघर व्यक्तींसाठी महापालिका प्रशासनाने अकाेटफैल पाेलिस ठाण्यासमाेरील मनपाच्या हिंदी शाळा क्रमांक ३ मध्ये तात्पुरता निवारा उभारला आहे. स्वयंसेवी संस्थेमार्फत हा उपक्रम राबविला जात असला तरी अनेक बेघर व्यक्ती या ठिकाणी न थांबता शहरात उघड्यावर राहणे पसंत करतात. त्यामुळे मनपाच्या उद्देशालाच नख लागले आहे. अशास्थितीत आता संपूर्ण जिल्हाभरातील बेघर व्यक्तींसाठी पालकमंत्री बच्चू कडू यांनी महापालिकेच्या शाळेची निवड केली आहे. रामदासपेठ स्थित टेम्पल गार्डनमधील मनपा उर्दू मुलांची शाळा क्रमांक ३ व मराठी मुलांची शाळा क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांची माेठी पटसंख्या असतानासुध्दा या शाळेतील विद्यार्थी रेल्वे स्टेशन चाैकातील जुन्या व शिकस्त इमारतीचा समावेश असलेल्या शाळा क्रमांक २१ मध्ये स्थानांतरण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. हा विचित्र प्रकार पाहता विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ केला जात असल्याचा आराेप करीत शुक्रवारी आक्रमण युवक संघटनेच्यावतीने मनपा आयुक्त निमा अराेरा यांच्याकडे निवेदन सादर केले.
निर्णय रद्द करा!
टेम्पल गार्डनमधील शाळेत गरीब कुटुंबातील २५० पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षणाचे धडे घेत आहेत. त्यांना शिकवण्यासाठी १५ शिक्षक सेवारत आहेत. विद्यार्थ्यांचे स्थानांतरण केल्यास चिमुकल्या विद्यार्थ्यांसमाेर व त्यांच्या कुटुंबीयांसमाेर अनेक समस्या निर्माण हाेतील. त्यामुळे या शाळेत बेघरांचा निवारा उभारण्याचा निर्णय पालकमंत्र्यांसह महापालिका प्रशासनाने रद्द करण्याची मागणी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.