हॉटेल उघडले म्हणून जिभेचे लाड नको, आला पावसाळा, पोट सांभाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:16 AM2021-07-17T04:16:14+5:302021-07-17T04:16:14+5:30
पावसाळ्यात हे खायला हवे पावसाळ्यात शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी असते. तेव्हा सकस, शुद्ध, पोषक, घरचे अन्नच खावे. विविध प्रकारच्या भाज्या, ...
पावसाळ्यात हे खायला हवे
पावसाळ्यात शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी असते. तेव्हा सकस, शुद्ध, पोषक, घरचे अन्नच खावे.
विविध प्रकारच्या भाज्या, फळे रोगप्रतिकारशक्ती वाढायला, पचन चांगले व्हायला मदत करतात. त्यामुळे त्याचे आहारातील प्रमाण वाढवावे.
मसाल्याचे पदार्थदेखील जसे की मिरपूड, आले, हिंग, हळद, कोथिंबीर, जिरे, लिंबू आदी पचन संस्था नीट काम करण्यासाठी मदत करतात.
पावसाळ्यात हे खाणे टाळायला हवे
पावसाळ्यात रस्त्यावरचे किंवा उघड्यावर ठेवलेले अन्नपदार्थ, तेलकट पदार्थ खाणे टाळावे.
दूषित पाण्याची समस्या असल्याने पाणीपुरी, दहीपुरी आदी चटकदार पदार्थ खाणे टाळावे.
कृत्रिम रंगाने बनविलेले पदार्थ, चायनीज पदार्थ खाणे शक्यतो टाळावे.
कार्बनेटेड पेयांमुळे शरीरातील मिनिरल्स कमी होतात तसेच शरीराची एन्झाईम्स तयार करण्याची क्षमता मंदावते. यामुळे अपचन होऊ शकते.
रस्त्यावरचे अन्न नकोच
पावसाळ्यात आरोग्याची काळजी खूप महत्त्वाची आहे. पावसाळ्यात रोगप्रतिकारशक्ती कमी होते. बॅक्टेरिया, विषाणूचे वाढलेले प्रमाण पावसाळ्यात अधिक असते. पदार्थ बनविण्यासाठी अनेकदा शुद्ध पाणी नसते, गाळलेले किंवा उकळलेले पाणी नसते, त्यामुळे पोटाचे विकार होऊ शकतात. उघड्यावर ठेवलेल्या अन्नावर माशा बसून ते अन्न दूषित करतात. त्यामुळे पोटाचे विकार उद्भवत असल्याने रस्त्यावरचे अन्नपदार्थ खाणे टाळावे.
हॉटेलमध्ये एकदाच घेतलेल्या तेलाचा वारंवार वापर होतो. हे तेल आरोग्यासाठी हानिकारक आहे. शिवाय, अशा पदार्थांमुळे लठ्ठपणा वाढण्याची जास्त शक्यता असते. विविध प्रकारच्या डाळी, फळांचे प्रमाण वाढवावे. पचनास हलके अन्न घ्यावे. पावसाळ्यात आरोग्याची अधिक काळजी घ्यावी.
- मुक्ता बगडिया, आहारतज्ज्ञ, अकोला