घाबरू नका; योग्य काळजी घेतल्यास कोरोनावर मात शक्य!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 09:49 AM2021-05-13T09:49:42+5:302021-05-13T09:52:26+5:30
Corona can be cure : लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच चाचणी करण्याचे आवाहन तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.
अकोला: पहिल्या लाटेच्या तुलनेत कोरोनाची दुसरी लाट अधिक घातक असल्याचे आकडेवारीवरून निदर्शनास येत आहे. मात्र, कोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार केल्यास कोरोनावर मात करणे शक्य आहे. त्यासाठी नागरिकांनी लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच चाचणी करण्याचे आवाहन तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.
कोविडच्या दुसऱ्या लाटेत गंभीर रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. अनेक रुग्णांचा सिटी स्कोअर दहापेक्षा जास्त असून, ऑक्सिजन पातळीही खालावलेली आहे. त्यामुळे ही दुसरी लाट अधिक घातक असल्याची भीती सर्वसामान्यांमध्ये आहे. मात्र, डॉक्टरांच्या मते कोविडच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता, योग्य वेळी चाचणी करून कोविडचे निदान केल्यास कमी वेळेत औषधोपचार करणे शक्य आहे. बहुतांश लोक असे न करता सुरुवातीचे तीन ते चार दिवस घरगुती उपचार करतात, बरे न वाटल्यास डाॅक्टरांकडे जातात, डॉक्टरांच्या औषधोपचाराने बरे न वाटल्यास रुग्ण कोविडची चाचणी करतात. तोपर्यंत कोविडची लागण होऊन पाच ते सहा दिवसांचा कालावधी झालेला असतो. तोपर्यंत रुग्णाच्या शरीरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरण्याची शक्यता असते. हा प्रकार टाळण्यासाठी लक्षणे दिसताच कोविड चाचणी करण्याचे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.
म्हणून लोक चाचणी टाळतात
लक्षणे असूनही अनेक जण अहवाल पॉझिटिव्ह येण्याच्या भीतीने चाचणी टाळतात.
पॉझिटिव्ह आल्यास कुटुंबापासून दहा दिवस दूर राहण्याची चिंता.
पॉझिटिव्ह रुग्णांच्या सहवासात राहावे लागणार.
कुटुंबातील इतर सदस्यांना काही झाले तर.
तर तुम्ही कोरोनाची साखळी तोडू शकता.
वेळीच चाचणी केल्यास कोविडचे निदान शक्य.
निदान होताच, स्वत:ला इतरांपासून वेगळे ठेवून कोविडचा संसर्ग रोखता येतो.
तुमच्या संपर्कातील इतरही लोक चाचणी करून कोरोनाचा फैलाव रोखू शकतात.
पहिले दहा दिवस महत्त्वाचे
कोरोनाची लागण झाल्यास पहिले दहा दिवस महत्त्वाचे आहेत.
पहिल्या तीन दिवसांतच रुग्णांवर योग्य उपचार झाल्यास रुग्ण लवकर बरा होतो.
साध्या औषधोपचारानेच रुग्ण बरा होऊ शकतो.
जनजागृतीची गरज
रुग्णाला कोविडचा संसर्ग झाल्यापासून ते रुग्ण अत्यवस्थ होण्याचा कालावधी कमी होत आहे. त्यामुळे कोरोनाच्या गंभीर रुग्णांचे प्रमाणही वाढले आहे. कोरोना पूर्वीपेक्षा अधिक घातक झाला असून, स्वत:चा बचाव करण्यासाठी काय करायला हवे, कोरोनापासून कसे सुरक्षित राहता येईल, तसेच प्रकृती अत्यवस्थ होण्यापूर्वीच नागरिकांमध्ये जनजागृतीची गरज आहे.
कोरोनाचे अर्ली डिटेक्शन झाल्यास रुग्णावर योग्य उपचार करणे शक्य आहे. त्यामुळे रुग्ण कमी वेळेत बरा होऊ शकतो, शिवाय त्याच्यापासून इतरांपर्यंत कोरोनाचा फैलाव रोखणेही शक्य होते.
- डॉ.मुकुंद अष्टपुत्रे, विभाग प्रमुख, मेडिसिन, जीएमसी, अकोला