धरणाचे दरवाजे उघडले
By Admin | Updated: September 8, 2014 00:04 IST2014-09-08T00:04:05+5:302014-09-08T00:04:05+5:30
तेल्हारा तालुक्यातील वान तर अकोट तालुक्यातील पोपटखेड धरणाचे दरवाजे अंशत: उघडले अतवृष्टीचा इशारा

धरणाचे दरवाजे उघडले
तेल्हारा/अकोट/पातूर : गत आठवडाभरापासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे जिल्हय़ातील जलाशयांची पातळी वाढत असून, तेल्हारा तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या वान प्रकल्पाचे सहा, तर पोपटखेड धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. येत्या २४ तासांत अतवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने नदीकाठच्या लोकांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.
गत महिन्यात प्रदीर्घ विश्रांती घेतल्यानंतर वरुणराजाने या महिन्याच्या सुरुवातीपासूनच जिल्हय़ात जोरदार हजेरी लावली आहे. गत आठवडाभरापासून जिल्हय़ात सर्वत्र दमदार पाऊस बरसत आहे. जिल्हय़ात अनेक ठिकाणी शनिवारी रात्रीपासूनच पावसाने जोर धरला आहे. या पावसामुळे जलाशयांची पातळी वाढली असून, तेल्हारा तालुक्यातील वान धरणाची पातळी शनिवारी ९0.९८ टक्के भरल्याने शनिवारी रात्री धरणाचे दोन दरवाजे १0 सेंटीमीटर उघडण्यात आले. रविवारीही दिवसभर पाऊस सुरूच होता. त्यामुळे दुपारी या धरणाची पातळी ९२ टक्क्यांवर गेल्याने आधी चार व रात्री सर्व सहा दरवाजे ३0 सेंटीमीटरने उघडण्यात आले.
नदीपात्रात विसर्ग होत असल्याने नदीकाठच्या गावंना सावधतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, आकोट तालुक्यातील पोपटखेड धरण ९0.६६ टक्के भरल्याने या प्रकल्पाचे दोन दरवाजे एक सेंटीमीटरने उघडण्यात आले.
** पातूर तलाव ओव्हर फ्लो
पातूर : गत आठवडाभरापासून पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या दमदार पावसामुळे बोर्डी नदीवरील पातूरच्या घाटाजवळचा तलाव १00 टक्के भरला असून, रविवारी तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहण्यास प्रारंभ झाला.
रविवारी दुपारी १२ वाजतापासून पातुरात दमदार पावसाला सुरुवात झाली. रविवारी दिवसभर पाऊस सुरूच होता. तालुक्यातही बहुतांश ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे नदी-नाले भरून वाहू लागले. दरम्यान, तालुक्यातील निगरुणा धरण ८३ टक्क भरले असून, मोर्णा धरण ४५ टक्के भरले आहे. इतरही लहान-मोठय़ा जलाशयांची पातळी वाढली आहे. पातूर तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहत असल्याने हे नयनरम्य दृष्य पाहण्यासाठी हौशी पर्यटकांची गर्दी होणार आहे.