डाळ, तेल, बेसनचे भाव घसरल्याने फराळ ‘गोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 02:13 AM2017-10-14T02:13:25+5:302017-10-14T02:14:20+5:30
ऐन सणासुदीच्या तोंडावर डाळ, तेल आणि बेसनचे भाव घसरल्याने यंदा दिवाळीचा फराळ स्वस्त होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही साखरेची मागणी वाढली असून, दिवाळीच्या निमित्ताने २0 ट्रक अतिरिक्त साखर विक्रीला जाणार असल्याचा अंदाज होलसेल किराणा बाजारातील व्यापार्यांनी व्यक्त केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : ऐन सणासुदीच्या तोंडावर डाळ, तेल आणि बेसनचे भाव घसरल्याने यंदा दिवाळीचा फराळ स्वस्त होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही साखरेची मागणी वाढली असून, दिवाळीच्या निमित्ताने २0 ट्रक अतिरिक्त साखर विक्रीला जाणार असल्याचा अंदाज होलसेल किराणा बाजारातील व्यापार्यांनी व्यक्त केला आहे.
दिवाळीच्या निमित्ताने प्रत्येक गोड पदार्थ तयार करण्यासाठी साखरेची आवश्यकता असते, त्यामुळे दरवर्षी दिवाळीत साखरेची विक्रमी विक्री होत असते. बाजारपेठेतील मागणीचा अंदाज बांधून पश्चिम महाराष्ट्रातून अकोल्यातील किराणा बाजारात शेकडो टन साखर दाखल झाली आहे. या दहा दिवसात किमान २0 ट्रक साखर अकोलेकर फस्त करणार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दिवाळीचा फराळ साखर आणि बेसनाशिवाय तयार होत नाही. त्यामुळे गरिबातील गरीब व्यक्ती साखर, डाळ आणि बेसनाची खरेदी केल्याशिवाय राहत नाही. दरम्यान, ऐन दिवाळीच्या निमित्ताने सोयाबीन तेल, खोबरा, वनस्पती तूप, बेसनचे दर स्वस्त झाले आहेत तर गुड, साखर, मैदा, रव्याचे दर स्थिरावले असल्याने किराणा बाजारात गर्दी वाढली आहे. पोहा, मुरमुरे, शेंगदाण्याची मागणीही वाढली आहे. जीएसटीमुळे बाजारपेठेत मंदी आली होती. दिवाळीच्या निमित्ताने बाजारात तेजी येईल, अशी अपेक्षा होती. ती अपेक्षा आता पूर्ण होत आहे. ऐन दिवाळीच्या निमित्ताने फराळ गोड होत असल्याने सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे.
१२ चाकी ट्रकमध्ये १६ टन साखरेचे पोते बसतात. २0 ट्रक साखर अकोल्यात येत असल्याने ३२0 टन साखर अकोलेकर दिवाळीत फस्त करणार आहेत. साखरेची आकडेवारी दिवसागणिक वाढत जात असल्याचेही जाणकारांचे मत आहे. मिठाई, लाडू, रसमलाई, अनारसे, करंजी, पेढा, बरफी, श्रीखंड, गुलाबजाम, रसगुल्ले आदी सर्व पदार्थ साखरेशिवाय तयारच होत नाहीत.
मैदा- ३६, रवा-३६, साखर-४२, बेसन ९५ ते १0८ , तेल ७२ ते ८0 आणि वनस्पती तूप ७५ ते ९५ रुपये किलोच्या दराने विक्रीला आहे. किराणा खरेदी करण्यासाठी आता ग्राहकांनी बाजारात गर्दी केली असून, बाजारात तेजी येत आहे.
-गोपाल शर्मा,
गोपाल सुपर बाजार,अकोला.