एकाच नाल्यासाठी दोनदा आर्थिक तरतूद; चौकशी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:15 AM2021-05-28T04:15:10+5:302021-05-28T04:15:10+5:30
अकोला: शहरात नालेसफाईच्या कामाला प्रारंभ होण्यापूर्वीच बांधकाम विभागातील खाबूगिरी चव्हाट्यावर आली आहे. शहरातील पूर्व व उत्तर झोनमध्ये एकाच नाल्याचा ...
अकोला: शहरात नालेसफाईच्या कामाला प्रारंभ होण्यापूर्वीच बांधकाम विभागातील खाबूगिरी चव्हाट्यावर आली आहे. शहरातील पूर्व व उत्तर झोनमध्ये एकाच नाल्याचा समावेश करून त्यावर तीन लाख रुपयांची आर्थिक तरतूद केल्याचा प्रकार प्रभाग २ मधील काँग्रेसच्या नगरसेविका चांदणी रवी शिंदे यांनी उघडकीस आणला आहे. या प्रकरणाची दखल घेत मनपा आयुक्त निमा अरोरा यांनी गुरुवारी चौकशीचे निर्देश दिले आहेत.
शहरात मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामांना प्रारंभ केला जाणार आहे. त्यासाठी मनपा आयुक्त निमा अरोरा यांच्या निर्देशानुसार कंत्राटी तत्त्वावर मोठे नाले साफ केले जाणार आहेत. दरम्यान, अशा मोठ्या नाल्यांचा सर्व्हे करण्याची जबाबदारी बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंत्यांकडे सोपविण्यात आली आहे. या अभियंत्यांनी दिलेल्या अहवालानुसार नाल्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. यादरम्यान उत्तर झोनमधील हनुमान मंदिरापासून ते बापू नगरपर्यंत नाला सफाईसाठी दोन लाख ९६ हजार रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली. पूर्व झोनमध्ये या नाला सफाईच्या नावात बदल करण्यात येऊन सुदर्शन चौकपासून नाग मंदिरापर्यंत ते बापूनगरसमोरील आपातापा रोडपर्यंतच्या नाल्यासाठी ७७ हजार रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली. अर्थात दोन झोनमध्ये दाखवलेला नाला एकच असल्याची बाब काँग्रेसच्या नगरसेविका चांदणी शिंदे व समाजसेवक रवी शिंदे यांनी उघडकीस आणली आहे. याप्रकरणी गुरुवारी नगरसेविका शिंदे यांनी मनपा आयुक्त निमा अरोरा यांच्याकडे धाव घेऊन सदर प्रकार त्यांना सांगितला.
आयुक्तांनी दिले चौकशीचे निर्देश
एकाच नाला सफाईसाठी दोन झोनच्या नावांचा वापर करून वेगवेगळी आर्थिक तरतूद करण्यात आल्याच्या प्रकाराची मनपा आयुक्त निमा अरोरा यांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश त्यांनी बांधकाम विभागाला दिले आहेत.