नया अंदुरा परिसरात दुबार पेरणीचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:23 AM2021-07-07T04:23:35+5:302021-07-07T04:23:35+5:30
नया अंदुरा परिसरात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस झाल्याने त्यानंतर काही दिवसांत पेरणीच्या कामांनी वेग घेतला होता. सद्य:स्थितीत परिसरातील ...
नया अंदुरा परिसरात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस झाल्याने त्यानंतर काही दिवसांत पेरणीच्या कामांनी वेग घेतला होता. सद्य:स्थितीत परिसरातील जवळपास ३० टक्के पेरणी आटोपली आहे, तर ७० टक्के पेरणी पावसाअभावी थांबली आहेत. आता मात्र पावसाने दडी मारल्याने त्यातच उन्हाच्या तडाख्याने पिके सुकू लागली असून, शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा लागली आहे. हवामान खात्याने मान्सून सक्रिय झाल्याचे सांगताच शेतकऱ्यांनी पेरणीसाठी बी-बियाणे, रासायनिक खते खरेदी केली. महागडे सोयाबीन बियाणे खरेदी करून शेतकऱ्यांनी पेरणी केली. त्यानंतर मृग नक्षत्रात प्रारंभी पाऊस बरसल्याने शेतकरी सुखावला होता. आता मात्र पावसाने दडी मारल्याने पूर्वीच्या पेरणीत उगवलेली पिके सुकल्याने दुबार पेरणी करावी लागणार आहे. त्यामुळे पाऊस लवकर येण्यासाठी खारपाणपट्ट्यातील महिलांनी साकडे घालीत पूर्णा नदीतील जलाने महादेव वरुणराजाला जलाभिषेक केला.
फोटो :
उन्हाच्या तडाख्याने पिके कोमेजली!
मृग नक्षत्रात प्रारंभी पाऊस आल्याने काही शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र, गत पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. उन्हाच्या तडाख्याने पिके सुकल्याने दुबार पेरणी करावी लागणार आहे. खारपाणपट्ट्यातील अंदुरा, कारंजा, रमजानपूर, हाता, निंबा फाटा, शिंगोली, निंबा, अंत्री, बहादुरा, सागद, मोखा, जानोरी परिसरात दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.