चारित्र्यावर संशय, सोन्याचे दागिने काढून हाकलून दिले! विवाहितेची तक्रार, पतीसह सासुविरूद्ध गुन्हा दाखल
By नितिन गव्हाळे | Published: August 19, 2023 10:52 PM2023-08-19T22:52:18+5:302023-08-19T22:53:03+5:30
Akola: पती व सासू चारित्र्यावर संशय घ्यायचे. माहेराहून ट्रॅक्टर घेण्यासाठी दोन लाख रूपयांचा तगादा लावून छळ करायचे. पैसे न आणल्यामुळे अंगावरील सोन्याचे दागिने काढून पती व सासुने घरातून हाकलून दिले.
- नितीन गव्हाळे
अकोला - पती व सासू चारित्र्यावर संशय घ्यायचे. माहेराहून ट्रॅक्टर घेण्यासाठी दोन लाख रूपयांचा तगादा लावून छळ करायचे. पैसे न आणल्यामुळे अंगावरील सोन्याचे दागिने काढून पती व सासुने घरातून हाकलून दिले. याप्रकरणात बोरगाव मंजू पोलिसांनी १७ ऑगस्ट रोजी पती व सासुविरूद्ध गुन्हा दाखल केला.
सांगळूद येथील २५ वर्षीय विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार तिचे लग्न २०२० मध्ये संग्रामपूर येथील सुनिल रामभाऊ तळोकार यांच्यासोबत झाले. वडिलांनी लग्नामध्ये तीन लाख खर्च केला. लग्नानंतर आठ महिने चांगली वागणूक मिळाली. त्यानंतर पती चारित्र्यावर संशय घ्यायचा. दारू पिऊन शिवीगाळ करून मारहाण करायचा. सासु मंदाबाई रामभाऊ तळोकारघरातील कामधंदा येत नाही म्हणून विवाहितेला शिवीगाळ करायची. २०२१ मध्ये मुलगी झाल्यानंतर पती व सासू मुलगी पाहायला आले नाहीत. त्यानंतर विवाहिता सासरी गेल्यानंतर पती चारित्र्यावर संशय घ्यायचे आणि ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेराहून दोन लाख रूपये आणण्याचा तगादा लावायचे. ६ एप्रिल २०२३ रोजी पती व सासूने विनाकारण वाद करून शिवीगाळ करून मारहाण केली आणि विवाहितेच्या अंगावरील सर्व सोन्याचे दागिने काढून घरातून हाकलून दिल्याचा आरोप विवाहितेने तक्रारीतून केला आहे.
भरोसा सेलमध्ये तडजोडीचा प्रयत्न
पती सुनिल तळोकार व सासू मंदाबाई हे सातत्याने चारित्र्यावर संशय घ्यायचे. ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेराहून दोन लाख रूपये आणण्याचा तगादा लावायचे. त्यामुळे विवाहितेने पोलिसांच्या भरोसा सेलमध्ये तक्रार दिली होती. या तक्रारीनुसार दोन्ही कुटूंबांमध्ये समेट घडविण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले. परंतु तडजोड न झाल्यामुळे अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.