२५४ कोटींचा ‘डीपीआर’; ११0 कोटी मंजूर
By admin | Published: October 25, 2016 03:08 AM2016-10-25T03:08:56+5:302016-10-25T03:08:56+5:30
अमृत योजना मार्गी; राज्यस्तरीय उच्चाधिकार समितीची हिरवी झेंडी
अकोला, दि. २४- अमृत योजनेंतर्गत संपूर्ण शहराची पाणीपुरवठा योजना सुरळीत करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने तयार केलेल्या २५४ कोटींच्या डीपीआर (प्रकल्प अहवाल) मधील ११0 कोटी ८४ लाखांच्या प्रस्तावाला सोमवारी राज्यस्तरीय तांत्रिक मूल्यमापन समिती व राज्यस्तरीय उच्चाधिकार समितीने हिरवी झेंडी दिली. महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी योजनेचा प्रस्ताव सादर केला. पहिल्या टप्प्यात शहरात जलवाहिनीचे जाळे, जलकुंभांची उभारणी आदींचा समावेश आहे.
संपूर्ण शहराच्या पाणीपुरवठा वितरण प्रणालीत बदल करण्यासाठी शासनाने ह्यअमृतह्ण योजनेंतर्गत कोट्यवधींच्या निधीची तरतूद केली. महान धरण ते अकोला शहरापर्यंतची मुख्य जलवाहिनी बदलणे, मोर्णा प्रकल्प ते महान धरणापर्यंत जलवाहिनी टाकणे, शहरातील मुख्य जलवाहिनीचे जाळे बदलणे आदींसह विविध कामांचा समावेश आहे. योजनेचा प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम शासन स्तरावरून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला देण्यात आले. मजीप्राने पाणीपुरवठा योजनेसाठी २५४ कोटी रुपये किमतीचा डीपीआर (प्रकल्प अहवाल) तयार केला. सदर प्रस्ताव महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी शासनाकडे सादर केला असता, शासनाने ह्यअमृतह्णयोजने अंतर्गत पहिल्या टप्प्यात ११0 कोटी ८४ लाखांच्या प्रस्तावाला मान्यता दिली.
दोन समित्यांसमोर सादरीकरण
अमृत योजनेच्या प्रस्तावावर नगर विकास विभागात दोन बैठका पार पडल्या. पहिल्या बैठकीत महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी राज्यस्तरीय तांत्रिक मूल्यमापन समितीसमोर योजनेचे सादरीकरण केले. समितीच्या प्रमुख नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर होत्या. दुसर्या बैठकीत प्रधान सचिव म्हैसकर यांनी राज्यस्तरीय उच्चाधिकार समितीचे प्रमुख मुख्य सचिवांसमोर योजना सादर केली.
दुसर्या टप्प्यात नवीन भागाचा समावेश
शहरात समावेश झालेल्या नवीन प्रभागातील विकास कामांचा योजनेच्या दुसर्या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे. शहराची लोकसंख्या लक्षात घेतल्यास काटेपूर्णा (महान) प्रकल्पातील आरक्षित जलसाठा कमी पडेल. त्यासाठी वान धरणाचा पर्याय समोर येऊ शकतो. दुसर्या टप्प्यात या सर्व बाबींचा मजीप्रा व पाटबंधारे विभागाकडून तांत्रिक अभ्यास करून समावेश केला जाईल.
या कामांचा आहे समावेश
योजनेच्या पहिल्या टप्प्यात मंजूर ११0 कोटी ८४ लाखातून शहरात नवीन आठ जलकुंभांची उभारणी करणे, २६४ किमीची जुनी जलवाहिनी बदलणे, १६१ किमी अंतराची नवीन जलवाहिनी टाक णे, कान्हेरी सरप गावानजीक ४ किमी अंतराची पाइपलाइन बदलण्यासह विविध कामांचा समावेश आहे.
मजीप्राने तयार केलेल्या २५४ कोटींच्या डीपीआरमधून पहिल्या टप्प्यासाठी ११0 कोटी ८४ लाखांचा प्रस्ताव शासनाने मंजूर केला. मनपा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी निविदा काढावी लागेल. दुसर्या टप्प्याला मंजुरी मिळाल्यानंतर उर्वरित कामे मार्गी लागतील.
- अजय लहाने, आयुक्त, मनपा