‘उध्दरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे...’चा जयघोष करीत महामानवाला वंदन!
By संतोष येलकर | Published: April 14, 2024 05:51 PM2024-04-14T17:51:57+5:302024-04-14T17:52:14+5:30
प्रकाश आंबेडकर यांनी केले बाबासाहेबांना अभिवादन; बौध्द महासभा, समता सैनिक दलाची मानवंदना...
अकोला: प्रज्ञासूर्य डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती रविवार १४ एप्रिल रोजी अकोला शहरासह जिल्हयात उत्साहात साजरी करण्यात आली. सामुहिक त्रिशरण पंचशिल ग्रहण करुन, विविध कार्यक्रम, उपक्रमांसह मिरवणूकव्दारे ‘उध्दरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे...’ असा जयघोष करीत, महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करण्यात करण्यात आले.भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अकोला शहरातील अशोक वाटीकासह जिल्हयातील गावागावांत बौध्द विहारांमध्ये आयोजित कार्यक्रमांमध्ये सामुहिक त्रिशरण पंचशिल व बुध्द वंदना घेण्यात आली. तसेच महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यासह विचारावर मंथन करीत अभिवादन करण्यात आले.
यासोबतच विविध ठिकाणी भोजनदान कार्यक्रम, गीत गायन व विविध उपक्रमांसह मिरवणुकीव्दारे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष करीत अभिवादन करण्यात आले. अकोला शहरातील अशोक वाटिका येथे डाॅ.बाबासाहेब यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन व मेणबत्त्या प्रज्वलीत करुन आंबेडकरी अनुयायांनी महामानवाला अभिवादन केले. जयंतीनिमित्त डाॅ.बाबासाहेब यांना वंदन करण्यासाठी बौध्द उपासक, उपासिकांसह विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसह आंबेडकरी अनुयायांची सकाळपासूनच गर्दी झाली होती.
प्रकाश आंबेडकर यांनी केले बाबासाहेबांना अभिवादन; बौध्द महासभा, समता सैनिक दलाची मानवंदना -
महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित भारतीय बौध्द महासभा अकोला जिल्हयाच्यावतीने शहरातील अशोक वाटीका येथे आयोजित कार्यक्रमात डाॅ.बाबासाहेब यांचे नातू तथा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड.प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर, प्रा.अंजली आंबेडकर, युवा नेते सुजात आंबेडकर यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यांच्या उपस्थितीत भारतीय बौध्द महासभा व समता सैनिक दलाच्यावतीने भारतरत्न डाॅ.बाबासाहेबांना मानवंदना देण्यात आली. तसेच सामुहिक त्रिशरण पंचशिल व बुध्द वंदना घेवून अभिवादन करण्यात आले. यावेळी भारतीय बौध्द महासभेचे जिल्हाध्यक्ष पी.जे.वानखडे, प्रदेश उपाध्यक्ष यू.जी.बोराळे,वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महिला आघाडीच्या प्रदेश महासचिव अरुंधती शिरसाट, जिल्हाध्यक्ष प्रभा शिरसाट, जिल्हा परिषद सत्तापक्ष गटनेता ज्ञानेश्वर सुलताने, विजय जाधव, विजय हिवराळे, गणेश दंदी, रामचंद्र वाकोडे, प्रतिभा अवचार, सिध्दार्थ देवदरीकर, धीरज इंगळे, पराग गवइ, विश्वास बोराळे आदींसह बौध्द उपासक, उपासिका, बौध्द महासभा, समता सैनिक दल, फुले शाहू आंबेडकर विद्वतसभा, सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह आंबेडकरी अनुयायी उपस्थित होते.