‘डॉ. बाबासाहेब’ ही काही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही - प्रा. ऋषिकेश कांबळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 04:09 PM2019-02-10T16:09:57+5:302019-02-10T16:10:26+5:30
डॉ. बाबासाहेब हे काही दलितांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही. बाबासाहेब आणि त्यांचे विचार ही प्रत्येक उपेक्षित माणसांची प्रॉपर्टी आहे, असे विधान वक्ता प्रा. ऋषिकेश कांबळे (औरंगाबाद) यांनी केले.
अकोला: शालेय अभ्यासक्रमात ‘थोरांची ओळख’ या पुस्तकातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर एक प्रकरण शिकविल्या जायचे. या प्रकरणामध्ये पहिलेच वाक्य ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे कैवारी होते’, असे होते. आजही हेच बालमनावर बिंबविल्या जाते; परंतु डॉ. बाबासाहेब हे काही दलितांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही. बाबासाहेब आणि त्यांचे विचार ही प्रत्येक उपेक्षित माणसांची प्रॉपर्टी आहे, असे विधान वक्ता प्रा. ऋषिकेश कांबळे (औरंगाबाद) यांनी केले.
दीनबंधू सृजनशील मंडळाच्यावतीने आयोजित आचार्य दीनबंधू व्याख्यानमालेतील पहिले पुष्प गुंफताना शनिवारी प्रा. कांबळे ‘लोकशाहीला धर्मांधांचे आव्हान व आजचे राजकारण’ या विषयावर बोलत होते. प्रा. कांबळे पुढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचताना, त्यांचे विचार आत्मसात करताना ते पहिले समजून घेतले पाहिजे. ओबीसी, सोशल जस्टिस हे शब्द प्रयोगदेखील पहिल्यांदा बाबासाहेबांनीच दिलेले आहेत. सोशल इंजिनिअरिंगची गोष्ट आज आपण करतो; मात्र ही चळवळदेखील त्या काळी बाबासाहेबांनीच सुरू केली. बाबासाहेबांनी युगानुयुगाचे मनुष्यत्व आपणास बहाल केले आहे. त्यामुळे स्वाभिमानाचा दिवा आपल्या हातून कधीच विझू नये, याची काळजी घेतली पाहिजे, असेदेखील कांबळे यांनी सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रवाद मानवतावादावर आधारलेला आहे. भारतीय राष्ट्रवादाचे प्रतिबिंब त्यांनीच तयार केलेल्या भारतीय राज्यघटनेत उमटले आहे. त्यांचा राष्ट्रवाद धर्मातीत आहे. धर्मनिष्ठ राष्ट्रवाद हा मुलत: लोकशाहीविरोधी असतो. अशा राष्ट्रवादामध्ये भिन्नधर्मीय अल्पसंख्याक वर्गाला दुय्यम नागरिकत्व प्राप्त होते. डॉ. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली लोकशाही ही सामाजिक लोकशाही आहे. संसदीय लोकशाहीला ते सामाजिक लोकशाही म्हणतात. कारण जन्म सिद्धतेवर अवलंबून असलेली प्रतिष्ठा आणि चातुर्वर्ण्य व्यवस्थेमुळे इथला दलित, बहुजन समाज सवर्णांच्या मानसिक व आर्थिक गुलामगिरीतून स्वतंत्र व समर्थ होऊ शकला नाही. कनिष्ठ वर्ग, शुद्रातिशुद्रांना सत्ता व हक्क, प्रतिष्ठा यापासून वंचित ठेवण्यात आले. अशा सर्वांसाठी सामाजिक समता प्रस्थापित करणे आवश्यक होते. आज देशात लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. धर्मांधता वाढली आहे. भारत जसा मनोरुग्णांचा देश आहे, तसाच दलदलींचा प्रदेश आहे. जो आंबेडकरवादी असतो, तो जात मानत नाही आणि जो जात मानतो, तो आंबेडकरवादी असू शकत नाही, असेही कांबळे यांनी सांगितले. व्याख्यान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डी. बी. शेगावकर होते. प्रास्ताविक शेगावकर यांनी केले. वक्त्यांचा परिचय डॉ. प्रा. एम. आर. इंगळे यांनी करू न दिला.