डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठातील कर्मचा-यांचं कामबंद आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2017 02:45 PM2017-08-09T14:45:20+5:302017-09-01T16:40:48+5:30
अकोला, दि. 9 - समान काम,समान वेतन लागू करून थकबाकी देण्यात यावी,या मागणीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्या सर्व रोजंदारी मजुरांनी बुधवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. यामुळे कृषि विद्यापीठाची शेती, संशोधनाची कामे प्रभावित होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने पारित केलेल्या कायदा १९७६ कलम ४ अन्वये तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे सर्व कृषि विद्यापीठात हे वेतन दिल्या जात आहे. तथापि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या रोजदांरी मजुरांना समान वेतन देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करत मजुरांनी आंदोलनाचे हत्यार उगारले आहे.
विद्यापीठाच्या बारा विभागातील रोजदांरी मजुरांनी कृषि विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोर हे आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाहीत. तोपर्यत आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचा निर्धार संघटनेच्या नेत्यांनी केला आहे. डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ प्रकल्पग्रस्त संघटनेच्या या आंदोलनाला भ्रष्टाचारविरोधी जन आंदोलन न्यास, हिंद मजदूर किसान पंचायत आदी संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.