डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात अकोल्यातील महिला डॉक्टर आरोपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 01:04 PM2019-05-29T13:04:12+5:302019-05-29T13:05:29+5:30
यामधील अंकिता खंडेलवाल ही महिला डॉक्टर अकोल्यातील रतनलाल प्लॉट चौक परिसरातील रहिवासी असून, तिच्यावर गुन्हा दाखल होताच ती फरार झाली आहे.
- सचिन राऊत
अकोला: मुंबईतील नायर हॉस्पिटलच्या वसतिगृहात डॉ. पायल तडवी हिचा रॅगिंगद्वारे प्रचंड छळ केल्यानेच आत्महत्या केल्याचे समोर आल्यानंतर तिला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तीन महिला डॉक्टरांविरुद्धमुंबईतील आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यामधील अंकिता खंडेलवाल ही महिला डॉक्टर अकोल्यातील रतनलाल प्लॉट चौक परिसरातील रहिवासी असून, तिच्यावर गुन्हा दाखल होताच ती फरार झाली आहे, तर तिची साथीदार डॉ. भक्ती मेहेरला अटक करण्यात आली असून, तिसरी साथीदार डॉक्टर हेमा आहुजा फरार आहे. या तीनही डॉक्टरांविरुद्ध निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय आणि बीवायएल नायर हॉस्पिटलमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या स्त्रीरोग विभागात दुसºया वर्षात (एम.डी.) शिक्षण घेत असलेल्या डॉ.पायल तडवी यांना वरिष्ठ सहकारी डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहेरे आणि अकोल्यातील रहिवासी रतनलाल प्लॉट चौकातील एका महाविद्यालयासमोरील रहिवासी डॉ. अंकिता खंडेलवाल या तिघींनी मानसिक त्रास देऊन अपमानित केले होते. डॉ. अंकिता खंडेलवाल हिचे वैद्यकीय शिक्षण नागपूर येथून झाल्याची माहिती असून, त्यानंतर ती मुंबईत उच्च शिक्षणासाठी होती. याच दरम्यान तिने आणखी दोन डॉक्टरांसोबत मिळून पायलचा प्रचंड छळ केला. त्यामुळे कंटाळून पायलने गळफास घेऊन आत्महत्या केली. पायलचे फेब्रुवारी २०१६ साली सलमान तडवी यांच्यासोबत लग्न झाले होते. सलमान सध्या कूपर रुग्णालयात सहायक प्राध्यापक म्हणून काम करतात. पायलने यापूर्वी गडचिरोली जिल्ह्यात डॉक्टर म्हणून काम केले आहे. त्यानंतर ती मुंबईत असताना या तीन महिला डॉक्टरांनी तिचा छळ करीत आत्महत्येस प्रवृत्त केले. त्यामुळे महिला डॉक्टरांविरोधात आग्रीपाडा पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी, रॅगिंगविरोधी कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, यामधील भक्तीला अटक करण्यात आली आहे. अंकिता खंडेलवाल आणि हेमा आहुजा या दोघी फरार आहेत. या तीन महिला सहकारी डॉक्टरांकडून प्रचंड छळ झाल्यानेच डॉ. पायल तडवी यांनी गळफास घेतल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला असून, तसे काही पुरावे त्यांच्या मोबाइलमध्येसुद्धा आढळल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत असून, आंदोलनेही छेडण्यात आली आहेत. या प्रकरणात डॉ. अंकिता खंडेलवाल आणि डॉ. हेमा आहुजा या फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. अंकिताच्या जामीन अर्जावर बुधवारी मुंबईतील न्यायालयात सुनावणी होणार असल्याची माहिती आहे.