आबासाहेब खेडकरांमुळे अकोल्याचे होते दिल्ली दरबारी वजन!
By नितिन गव्हाळे | Published: April 7, 2024 09:53 PM2024-04-07T21:53:58+5:302024-04-07T21:56:05+5:30
किस्सा कुर्सी का : अकोलेकरांनी जिल्ह्याचे पहिले खासदार म्हणून पाठविले होते संसदेत
अकोला : देशाला स्वातंत्र्य मिळून अवघी तीन वर्षं झाली हाेती. १९५१ मध्ये लोकसभेची पहिली सार्वत्रिक निवडणूक पार पडली. त्यावेळी यत्र तत्र सर्वत्र काँग्रेसचाच बोलबाला होता. त्यावेळी काँग्रेसने अकोला लोकसभा मतदारसंघातून शेतकरी नेते डॉ. गोपाळराव उर्फ आबासाहेब खेडकर यांना संधी दिली. अकोलेकरांनीही त्यांना प्रचंड बहुमताने कौल देत, अकोल्याचे पहिले खासदार म्हणून संसदेत पाठविले होते. त्याकाळी दिल्ली दरबारी वजन असणारे ते एकमेव नेते होते.
डॉ. गोपाळराव बाजीराव देशमुख उर्फ आबासाहेब खेडकर हे मूळचे विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील खेड येथील राहणारे. १९१७ मध्ये मॅट्रिक झाल्यानंतर आबासाहेबांनी कोलकाता येथून होमिओपॅथीचे शिक्षण घेतले. १९२० मध्ये ते अमरावती व्हिक्टोरिया टेक्निकल स्कूलमध्ये शिकत असताना त्यांचा महात्मा गांधी यांच्या असहकार चळवळीशी संबंध आला. ते स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले. त्यांनी १९२३ मध्ये शिवाजी बोर्डिंगची स्थापना केली. पुढे शिवाजी एज्युकेशन सोसायटी म्हणून ही संस्था उदयास आली.
आबासाहेब खेडकर हे संयुक्त महाराष्ट्राचे नायक होते. मराठी लोकांच्या व्यापक हितासाठी सर्व मराठी भाषिक प्रदेश एक महाराष्ट्र म्हणून एकत्र यावेत, अशी त्यांची इच्छा होती. अकोला लोकसभा मतदारसंघातून ते खासदार म्हणून दोनदा निवडून गेले होते. १९५१ ते १९६० या काळात त्यांनी लोकसभेत अकोला जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांनी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या सांगण्यावरून लोकसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर १९६२ मध्ये अकोट मतदारसंघातून महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या विधानसभेसाठी निवडून गेले होते. त्यांनी महाराष्ट्राचे पहिले ग्रामविकासमंत्री म्हणून काम पाहिले. त्यानंतर १९६७ च्या विधानसभा निवडणुकीत अकोट मतदारसंघातून पुन्हा निवडून गेले आणि त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा त्यांच्या खांद्यावर सोपविली गेली.
फोटो: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासमवेत पहिले ग्रामविकास मंत्री डॉ. आबासाहेब खेडकर.
ऑफर मुख्यमंत्रिपदाची; पण स्वीकारले ग्रामविकास खाते
आबासाहेब खेडकर हे दिल्ली दरबारी वजन असलेले आणि त्यांच्या शब्दाला मान असणारे नेते होते. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्रात पाठविले. विधानसभेच्या निवडणुका झाल्या. काँग्रेसला घवघवीत यश मिळाल्यानंतर आबासाहेब खेडकरांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी वर्णी लागणार होती. तसे त्यांना सांगण्यातही आले. परंतु, त्यांनी विनम्र नकार देत, ग्रामीण भागाचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून ग्रामविकास खाते स्वीकारले आणि ते महाराष्ट्राचे पहिले ग्रामविकासमंत्री झाले.
पं. नेहरू, इंदिरा गांधीही घ्यायच्या आबासाहेबांचा सल्ला
आबासाहेब खेडकर हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे पहिले अध्यक्ष होते. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी डॉ. खेडकर यांना महाराष्ट्राचे नेते मानत आणि महाराष्ट्र राज्याच्या प्रश्नांवर त्यांचा सल्ला घेत असत. डॉ. गोपाळराव खेडकर यांच्या मंत्रिपदाच्या काळात महाराष्ट्रात झालेली प्रगती पाहता, त्यावेळच्या पंचायती राजव्यवस्थेचा अभ्यास करत पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन इन्स्टिट्यूटने त्यांच्या कार्याची नोंद करून ठेवली आहे.