डॉ. पंदेकृवि दीक्षांत समारंभ; २,२११ विद्यार्थी करणार पदवी ग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 06:31 PM2020-02-04T18:31:16+5:302020-02-04T18:31:31+5:30
४४ विद्यार्थ्यांनी विविध विषयात प्रावीण्य प्राप्त केल्याने सुवर्ण पदकासह ७९ पदके प्रदान केली जाणार आहेत.
अकोला : यावर्षी ३०६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, यापैकी २,२११ विद्यार्थी प्रत्यक्ष दीक्षांत समारंभाला उपस्थित राहून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत पदवी ग्रहण करणार आहेत. यातील ४४ विद्यार्थ्यांनी विविध विषयात प्रावीण्य प्राप्त केल्याने सुवर्ण पदकासह ७९ पदके प्रदान केली जाणार आहेत. यावर्षी प्रथमच ५० नवे कृषी (पीएचडी) शास्त्रज्ञ देशाला मिळणार असल्याची माहिती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू विलास भाले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा ३४ वा दीक्षांत समारंभ उद्या बुधवार, ५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता दीक्षांत सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, कृषी मंत्री दादाजी भुसे, कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाचे अध्यक्ष प्रा. आदित्य कुमार मिश्रा उपस्थित राहणार आहेत. दीक्षांत भाषण प्रा. मिश्रा करतील. यावर्षी गायत्री देवी या विद्यार्थिनीने बीएसी पदवी परीक्षेत प्रावीण्य प्राप्त करीत ८ पदकांची मानकरी ठरली आहे. त्यातील ४ सुवर्ण पदके आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा विद्यार्थी संजय येवले पाच सुवर्ण पदकांचा मानकरी ठरला आहे. यावर्षी प्रथमच ५० जणांनी आचार्य (पीएचडी) पदवी पूर्ण केली आहे. त्यांना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते पदवी प्रदान केली जाणार आहे.
यावर्षी सर्वाधिक २०७५ बीएससी कृषी अभ्यासक्रमाचे उतीर्ण झाले असून, यामध्ये बीटेक अभियांत्रिकीचे १२५ विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत. तसेच उद्यान विद्या १५९, वनविद्या १९, जैवतंत्रज्ञान १०६, कृषी व्यवसाय व्यवस्थापन ७१, अन्नशास्त्र ८५ या विविध शाखांचा समावेश आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे ४२८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, यामध्ये कृषी शाखा २७५ उद्यानविद्या ३१, वनविद्या १५, एमटेक (कृषी अभियांत्रिकी) २८, कृषी एमबीए ५० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. प्रत्यक्ष उपस्थित राहून पदवी ग्रहण करणाऱ्यांमध्ये १,४२८ मुले असून, ७८३ मुलींचा समावेश असल्याचे डॉ. भाले यांनी सांगितले.