अकोल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ मानांकनात राज्यात सर्वोकृष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 01:25 PM2019-04-12T13:25:43+5:302019-04-12T13:25:54+5:30
अकोला: भारतीय कृषी संशोधन (आयसीएआर) परिषदेच्या अधिस्वीकृती समितीने केलेल्या राज्यातील कृषी विद्यापीठांच्या मानांकनानंतर अकोल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ संशोधन, शिक्षण व विस्तार कार्यात राज्यात सर्वोकृष्ट कार्य करणारे ठरले आहे.
अकोला: भारतीय कृषी संशोधन (आयसीएआर) परिषदेच्या अधिस्वीकृती समितीने केलेल्या राज्यातील कृषी विद्यापीठांच्या मानांकनानंतर अकोल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ संशोधन, शिक्षण व विस्तार कार्यात राज्यात सर्वोकृष्ट कार्य करणारे ठरले आहे.
राज्यातील कृषी विद्यापीठांच्या शिक्षण, संशोधन व विस्तार कार्याचा दर्जा घसरल्याने भारतीय कृषी संशोधन (आयसीएआर अॅक्रिडेशन कमिटी) परिषदेच्या केंद्रीय अधिस्वीकृती समितीने मागील तीन वर्षांपूर्वी दोन वर्षांसाठी या कृषी विद्यापीठांचे मानांकन रद्द केले होते. त्या राज्याच्या कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ, शिक्षकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती. त्याची कारणेही नंतर समोर आली. यामध्ये २०१४ पर्यंत राज्यात खासगी कृषी महाविद्यालयांची संख्या भरमसाट वाढल्याचे सांगण्यात आले. कृषी विद्यापीठांची संचालक, विभाग प्रमुख, प्राध्यापक आदी अर्ध्याच्यावर पदेही रिक्त होती. शासनाने पदेच न भरल्याने शिक्षण, संशोधन व कृषी विस्तार कार्याचा ताण हा अपूर्ण मनुष्यबळावर पडला. कृषी विद्यापीठाचे शासकीय महाविद्यालय तसेच खासगी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांची परीक्षा, उत्तरपत्रिका तपासणी आदी अतिरिक्त कामे करावी लागत असल्याने शैक्षणिक गुणवत्ता ढासळली. संशोधनावरही परिणाम झाले. ‘आयसीएआर’च्या अधिस्वीकृती समितीला मागच्या तीन वर्षांपूर्वी हे सर्व ठळकपणे दिसले. अकोल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ प्रचंड मागे पडल्याचे समोर आले. पहिल्या १० क्रमांकात राहणारे हे विद्यापीठ मानाकंनात ४८ व्या क्रमांकावर पोहोचले होते. म्हणूनच आयसीएआरने या कृषी विद्यापीठांची अधिस्वीकृती रद्द केली होती. ही अधिस्वीकृती हटवून कृषी विद्यापीठांना संशोधनासाठीचा निधी मिळावा, यासाठीचे प्रयत्न शासनाला करावे लागले. त्यानंतर राज्यातील कृषी विद्यापीठांची संचालक, अधिष्ठाता, सहयोगी अधिष्ठाता व प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्यात आली. ३५० प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक म्हणून करिअर अॅडव्हान्स स्कीम अंतर्गत बढती देण्यात आली. १५० पदे बढती व थेट भरतीद्वारे भरण्यात आली. कृषी विद्यापीठांसह खासगी ‘ड’ वर्गातील कृषी महाविद्यालयांचा शिक्षणाचा दर्जा सुधारण्यात यश आल्याने जानेवारी महिन्यात आलेल्या अधिस्वीकृती समितीच्या निदर्शनास आले. पदे तर भरण्यात आलीच, शिवाय सर्वच अनुषंगाने काम सुधारल्याने राज्यात अकोल्याचे विद्यापीठ मानांकनात सर्वोकृष्ट ठरले आहे.
- शासकीय, खासगी महाविद्यालयांचा शैक्षणिक दर्जा सुधारला असून, विस्तार, संशोधन कार्यही आयसीएआरच्या समितीने केलेल्या मानांकनात दिसूून आले. म्हणूनच २.९१ ग्रेडिंग मिळाले.
डॉ. व्ही. एम. भाले,
कुलगुरू,
डॉ. पंदेकृवि, अकोला.