डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कृषी शिक्षा सन्मान पुरस्काराने सन्मानित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 11:12 AM2021-02-14T11:12:32+5:302021-02-14T11:12:41+5:30
PDKV Akola News देशातील आठ कृषी विद्यापीठांमधून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची या पुरस्कारासाठी निवड झाली.
अकोला: महिंद्रा फाऊंडेशनतर्फे आयोजित महिंद्रा समृद्धी: इंडिया ॲग्री अवॉर्ड्स २०२० अंतर्गत अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला ‘कृषी शिक्षा सन्मान पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. देशातील आठ कृषी विद्यापीठांमधून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची या पुरस्कारासाठी निवड झाली. दिल्ली येथे आयोजित महिंद्रा कृषी सन्मान पुरस्कार वितरण सोहळ्यात हा पुरस्कार दिला जाणार होता, परंतु कोविडच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम स्थगित करण्यात आला होते. त्यामुळे महिंद्रा समूहातर्फे या पुरस्काराचे वितरण गुरुवारी विद्यापीठाच्या मुख्यालयी करण्यात आले. या प्रसंगी महिंद्रा समूहातर्फे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाते कुलगुरू डॉ.विलास भाले यांना प्रतिष्ठेचा कृषी शिक्षा सन्मान पुरस्कार २०२० देऊन गौरविण्यात आले. यावेळी आपल्या कामाप्रति निष्ठा, सचोटी, त्यागाची आणि एकात्मिक प्रयत्नांची भावना कार्याची यशस्वी फलश्रुती आणि सन्मानाची प्रचिती देणारी ठरते असे समाधानकारक प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोलाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी केले. विदर्भातील एक प्रमुख पीक कपाशी मधील गुलाबी बोंड अळीचे युद्धपातळीवर निर्मूलन करण्यासाठी विद्यापीठांतर्गत विस्तार शिक्षण संचालनालय, कीटकशास्त्र विभाग,कृषी विज्ञान केंद्र,कृषी संशोधन केंद्र, कृषी महाविद्यालय, कृषी तंत्र विद्यालय, राज्य शासनाचा कृषी विभाग, विविध सेवाभावी संस्था, कृषीचा अभ्यासक्रम पूर्ण करीत असलेले विद्यार्थी, गावातीलच स्वयंसेवक आदींचे एकत्रित प्रयत्नातून अपेक्षित साध्य झाल्याचे मत डॉ. भाले यांनी व्यक्त केले. महिंद्रा समूहातर्फे शेती आणि तत्सम क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या शेतकरी बांधव, युवा शेतकरी, शेतीनिष्ठ महिला, शेती मधील यांत्रिकीकरण, व्यावसायिक संस्था, तसेच कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्र आणि सेवाभावी संस्था, अशा एकूण आठ प्रकारांमध्ये दरवर्षी राष्ट्रीय स्तरावरील महिंद्रा समृद्धी इंडिया कृषी सन्मान पुरस्कार दिल्या जातात. याप्रसंगी रोशन महात्मे, स्नेहल समीर ढवळे यांच्यासह संचालक विस्तार शिक्षण डॉ. दिलीप मानकर, संचालक संशोधन डॉ. विलास खर्चे, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. सुधीर वडतकर, अधिष्ठाता उद्यानविद्या डॉ. प्रकाश नागरे, डॉ. धनराज उंदीरवाडे, डॉ. ययाती तायडे, डॉ.बी. व्ही. सावजी, कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे, विद्यापीठ अभियंता श्रीमती रजनी लोणारे, वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ, विभाग प्रमुख आदींची उपस्थिती होती.