अकोला‘जीएमसी’ अधिष्ठाता पदाचा प्रभार पुन्हा डॉ. राजेश कार्यकर्ते यांच्याकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 03:49 PM2018-06-09T15:49:01+5:302018-06-09T15:49:01+5:30
अकोला: येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता पदाचा प्रभार पुन्हा डॉ. राजेश कार्यकर्ते यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
अकोला: येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता पदाचा प्रभार पुन्हा डॉ. राजेश कार्यकर्ते यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. नियमित अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांनी नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सेवा देण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर त्यांची नियुक्ती तेथे करण्यात आली असून, जाण्यापूर्वी ते आपला प्रभार सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख व यापूर्वीही अधिष्ठातापदाची जबाबदारी सांभाळलेले डॉ. राजेश कार्यकर्ते यांच्याकडे देऊन गेले आहेत. शासनाकडून अद्याप त्यांच्याकडे अधिकृतपणे पदभार देण्याचा आदेश प्राप्त झालेला नाही.
धुळे येथील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदाची जबाबदारी सांभाळलेले डॉ. अजय केवलिया यांची अकोला ‘जीएमसी’चे अधिष्ठाता म्हणून अजय केवलिया यांनी १० एप्रिल रोजी पदभार स्वीकारला होता. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी नवे उपक्रम राबवून चांगल्या प्रकारे जबाबदारी सांभाळली. तथापि, त्यांना पूर्वीपासूनच नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुजू होण्याची इच्छा होती. जवळपास दोन महिने येथील अधिष्ठातापदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर ५ जून रोजी ते नागपूरला रवाना झाले. जाण्यापूर्वी सायंकाळी त्यांनी डॉ. कार्यकर्ते यांच्याकडे आपला पदभार सोपविला. बुधवार, ६ जूनपासून डॉ. कार्यकर्ते यांनी अधिष्ठातापदाचा प्रभार सांभाळण्यास सुरुवात केली.