डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ.शरद गडाख
By राजेश शेगोकार | Published: September 19, 2022 04:29 PM2022-09-19T16:29:25+5:302022-09-19T16:29:25+5:30
ते राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक पदी कार्यरत आहेत.
अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या नवीन कुलगुरू पदी डॉ. शरद गडाख यांची वर्णी लागली असून, ते राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक पदी कार्यरत आहेत.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांचा कार्यकाळ सप्टेंबर महिन्यात संपुष्टात आला. त्यामुळे या पदावर नवीन व्यक्तीचा शोध सुरू झाला. यासाठी अर्ज मागवण्यात आले होते. दोन महिन्यापासून नवीन कुलगुरूंच्या निवडीसाठी प्रक्रिया सुरू होती. जवळपास ३० जणांनी अर्ज केले. शोध समितीने त्यांच्या मुलाखती घेऊन अंतिम पाच जणांची नावे राजभवनाकडे पाठविली होती.
या नावांमध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांच्यासह भारतीय कृषी संशोधन परिषदेचे संचालक अशोककुमार पात्रा (भोपाळ), भारतीय कापूस संशोधन परिषदेचे संचालक डॉ. विजय वाघमारे (नागपूर), महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. शरद गडाख (राहुरी, नगर) आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर (परभणी) या पाच जणांचा समावेश होता. या सर्वांच्या मुलाखती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतल्या. दरम्यान, डॉ.शरद गडाख यांची निवड करण्यात आली. याबाबत राज्यपालांनी आदेश दिले असून, ते लवकरच पदभार स्विकारणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे