डाॅ.सुनिल लहाने यांनी स्वीकारली आयुक्तपदाची सुत्रे
By आशीष गावंडे | Published: March 7, 2024 08:22 PM2024-03-07T20:22:19+5:302024-03-07T20:22:32+5:30
महापालिकेच्या कामकाजाचा आज घेणार आढावा
अकाेला: महापालिकेत डाॅ.सुनिल लहाने यांनी गुरुवारी सायंकाळी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. शुक्रवारी ते प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेतील.
महापालिकेच्या तत्कालीन आयुक्त कविता द्विवेदी यांची राज्य शासनाने २३ फेब्रुवारी राेजी पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयात अतिरिक्त आयुक्तपदावर बदली केली हाेती. तेव्हापासून मनपाच्या आयुक्तपदी काेण, याकडे सर्वांचे लक्ष लागले हाेते. मध्यंतरी शासनाकडून नियुक्त झालेल्या मनपातील काही अधिकाऱ्यांनी आयुक्तपदासाठी मंत्रालयात वेगवान हालचाली केल्या हाेत्या. अखेर नगर विकास विभागाने ६ मार्च २०२४ राेजी नागपूर महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदी कार्यरत डाॅ.सुनिल लहाने यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला.
डाॅ.लहाने यांनी गुरुवारी सायंकाळी आयुक्तपदाची सुत्रे स्वीकारली. महापालिकेत दाखल झाल्यानंतर उपायुक्त गीता वंजारी, गीता ठाकरे यांच्या हस्ते डॉ.लहाने यांना पुष्पगुच्छ देण्यात आला. यावेळी मुख्य लेखापरिक्षक विकास खामकर, नगर रचनाकार आशिष वानखडे, सहा.आयुक्त विजय पारतवार, विठ्ठल देवकते, अनिल बिडवे, अतुल दलाल, गजानन मुर्तळकर, संजय राजनकर, अमोल डोईफोडे, शाम बगेरे, शाम राऊत, जितेंद्र तिवारी आदींची उपस्थिती होती.
आठ महिन्यानंतर पुन्हा अकाेल्यात वर्णी
नांदेड महापालिकेत आयुक्तपदावर कार्यरत असताना राज्य शासनाने डाॅ.सुनिल लहाने यांची जुलै २०२३ मध्ये अकाेला महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती आदेश जारी केला हाेता. परंतु तेव्हा डाॅ.लहाने यांनी पदभार स्वीकारला नव्हता. यादरम्यान, त्यांची नागपूर मनपात बदली झाली. आठ महिन्यांच्या कालावधीनंतर आता पुन्हा डाॅ.लहाने यांची अकाेला मनपात आयुक्तपदी वर्णी लागली,हे येथे उल्लेखनिय.