डॉ. ठिम्मापाई मेमोरियल क्रिकेट स्पर्धा : विदर्भ संघात अकोल्याचे पाच क्रिकेटपटू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 04:26 PM2019-07-09T16:26:20+5:302019-07-09T16:26:23+5:30
अकोला क्रिकेट क्लबच्या अथर्व तायडे, दर्शन नळकांडे, आदित्य ठाकरे, पवन परनाटे व नयन चव्हाण या पाच क्रिकेटपटूंचा समावेश करण्यात आला आहे.
अकोला : कर्नाटक राज्यातील बेंगळुरु येथे १० जुलै पासून सुरु होणाऱ्या डॉ. ठिम्मापाई मेमोरियल क्रिकेट स्पर्धेकरीता विदर्भाच्या वरिष्ठ संघाची घोषणा झाली असून, यामध्ये अकोला क्रिकेट क्लबच्या अथर्व तायडे, दर्शन नळकांडे, आदित्य ठाकरे, पवन परनाटे व नयन चव्हाण या पाच क्रिकेटपटूंचा समावेश करण्यात आला आहे.
विदर्भ संघ ८ जुलैला बेंगळुरुकरीता रवाना झाला असून, विदर्भाचा पहिला सामना १० जुलै रोजी बांगलादेश क्रिकेट एकादश संघाविरुद्ध होणार आहे. दुसरा सामना केएससीए संघाविरुद्ध, तर तिसरा सामना डी. वाय. पाटील संघाविरुद्ध होणार आहे. या खेळाडूंपैकी अथर्व, दर्शन व आदित्य यांनी यापूर्वी १४ ते २३ वर्षाखालील विदर्भ संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. तसेच १९ वर्षाखालील भारतीय संघ, रणजी, इराणी ट्रॉफीमध्येही प्रतिनिधीत्व केले आहे. दर्शन नळकांडे याने यावर्षी आयपीएल स्पर्धेत किंग्स एलेव्हन पंजाब संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. तर नयन चव्हाण याने १४ ते २३ वर्षाखालील विदर्भ संघ व १९ वर्षाखालील चॅलेंजर ट्रॉफी स्पर्धेत भारतीय रेड संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. अकोला क्रिकेट क्लबसाठी ही अभिमानाची बाब असल्याचे अकोला क्रिकेट क्लबचे कर्णधार तथा व्ही.सी.ए. चे जिल्हा संयोजक भरत डिक्कर यांनी सांगितले.