राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन : कृषीप्रधान देशात शेतीला कनिष्ठ दर्जा - डॉ. विलास खर्चे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2017 05:31 PM2017-11-25T17:31:51+5:302017-11-25T17:33:49+5:30
आज शेतीला कनिष्ठ लेखल्या जात असल्याची खंत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांनी शनिवारी अकोल्यात व्यक्त केली.
नीलिमा शिंगणे-जगड/ अकोला: गावाचा जर विचार केला तर शेती हा मुख्यघटक आहे. जगात जोपर्यंत अन्न सेवन करायचे आहे. तोपर्यंत शेतीला महत्त्व राहिलच. परंतु आज शेतीला कनिष्ठ लेखल्या जात असल्याची खंत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांनी शनिवारी अकोल्यात व्यक्त केली. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या ४९ व्या पुण्यस्मृतीच्या निमित्ताने अकोला महानगरीत स्व.श्रीराम भाकरे महाराज साहित्य नगरीमध्ये ‘जगाचा पोशिंदा बळीराजा’ ला समर्पित पाचवे राज्यस्तरीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. दोन दिवसीय या संमेलनाचे उद्घाटन डॉ.विलास खर्चे यांच्या हस्ते झाले. स्वराज भवन प्रांगणात संमेलन होत आहे. संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ राष्ट्रीय ग्रामगीता प्रचारक सत्यपाल महाराज चिंचोळकर होते.
डॉ. खर्चे पुढे म्हणाले की, अलीकडे शेतक-यांच्या समस्यांमध्ये वाढ होत आहे. यावर एकच उपाय म्हणजे गावागावातून शेतीचे शिक्षण मिळाले पाहिजे. शेतक-यांसाठी शिक्षण, संशोधन, विस्ताराचे कार्य वाढविले पाहिजे. बदलत्या परिस्थितीत नैसर्गिक संसाधनाच्या प्रतमध्ये समस्या येत आहे. नवनवीन संशोधन शेतीमध्ये यायला पाहिजे. परंतु युवावर्गच शेतीकडे पाठ फिरवित आहे. शेतीकडे तरू ण वर्गाचे दुर्लक्ष होत आहे. तरूण शेतीकडे वळला पाहिजे. यासाठी शेतीचे मुलभूत शिक्षण देण्याकरिता शेती शाळा-महाविद्यालय मोठया संख्येने उभे राहिले पाहिजेत, असेही डॉ. खर्चे यांनी सांगितले.
विदर्भाला निसर्गाने शेतीकरिता चांगले हवामान दिले आहे. याकरिता शेतक-यांना शास्त्रशुद्ध शेती करणे आवश्यक आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाद्वारे शेतक-यांना मुलभूत कृषी शिक्षण दिले जाते. परंतू शेतक-यांपर्यंत पोहचण्यासाठी मर्यादा येतात. किर्तनासारखे कार्यक्रम घेवून शेती शिक्षणाचा प्रचार व प्रसार होण्याकडे विद्यापीठ भर देत आहे. विद्यापीठाने राबविलेला हा उपक्रम संपूर्ण देशात सुरू व्हावा, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. यासाठी विदर्भातून विशेष पाऊले उचलले आहे, अशी माहिती देखील यावेळी डॉ. खर्चे यांनी दिली.
यावेळी विचारपीठावर ग्रामगीता प्रचारक गोवर्धन खवले, आजीवन प्रचारक आचार्य हरिभाऊ वेरूळकर, स्वागताध्यक्ष कृष्णा अंधारे, राष्ट्रीय किर्तनकार हभप आमले महाराज, उपजिल्हाधिकारी संजय खडसे, आजीवन प्रचारक डॉ.भाष्कर विघे, भजनप्रचारक विजय मुंडगावकर, प्रभात चॅरिटेबल सोसायटीचे अध्यक्ष साहेबराव नारे, राष्ट्रसंत विचार अभ्यासक ज्ञानेश्वर रक्षक आदी उपस्थित होते.