नाली तुडुंब; नगरसेवकांचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:18 AM2021-04-18T04:18:49+5:302021-04-18T04:18:49+5:30
जलवाहिनीचे काम ठप्प अकाेला : महापालिका प्रशासनाने ‘अमृत’ अभियानांतर्गत जलवाहिनीचे जाळे टाकण्याचे कंत्राट ‘एपी ॲण्ड जीपी’नामक एजन्सीला दिले आहे. ...
जलवाहिनीचे काम ठप्प
अकाेला : महापालिका प्रशासनाने ‘अमृत’ अभियानांतर्गत जलवाहिनीचे जाळे टाकण्याचे कंत्राट ‘एपी ॲण्ड जीपी’नामक एजन्सीला दिले आहे. कंत्राटदाराने लक्कडगंज भागातील प्रभाग क्रमांक ७ मध्ये जलवाहिनीचे जाळे अर्धवट टाकले असून, त्यापुढील काम बंद केले आहे. यामुळे जलवाहिनी असूनही नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या प्रकाराकडे मनपाच्या जलप्रदाय विभागाने कानाडाेळा केल्याचे दिसत आहे. कामगार कल्याण मंडळासमाेर मातीचे ढीग
अकाेला : जुन्या शहरातील प्रभाग क्रमांक ९ अंतर्गत येणाऱ्या कामगार कल्याण मंडळालगत मनपाची मुख्य जलवाहिनी आहे. सदर जलवाहिनीला मागील अनेक दिवसांपासून गळती लागत आहे. जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी याठिकाणी खाेदकाम करण्यात आले असता कामगार कल्याण मंडळासमाेर मातीचे ढीग साचविण्यात आले आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सडका भाजीपाला उघड्यावर !
अकाेला : जुन्या शहरातील प्रभाग क्रमांक १० अंतर्गत येणाऱ्या शिवचरण पेठ येथील छत्रपती शिवाजी महाराज चाैक परिसरात भाजीपाला विक्री केली जाते. भाजीपाला व फळ विक्री केल्यानंतर सदर व्यावसायिक सडका भाजीपाला रस्त्यालगत उघड्यावर फेकून देत असल्याने अस्वच्छतेची समस्या निर्माण झाली आहे. या प्रकाराकडे मनपाच्या आराेग्य निरीक्षकाचे दुर्लक्ष हाेत आहे.
जि.प. अध्यक्षांच्या निवासस्थानासमाेर सांडपाणी
अकाेला : जिल्हा परिषद अध्यक्षांच्या शासकीय निवासस्थानासमाेरील मुख्य रस्त्यावर नालीतील घाण सांडपाणी तुंबले आहे. परिसरातील खासगी हाॅस्पिटलमधून निघणारे सांडपाणी वाहून जाणाऱ्या नाल्यांची मनपाकडून साफसफाई केली जात नसल्यामुळे चक्क मुख्य रस्त्यावरून सांडपाणी वाहत आहे. या प्रकाराकडे मनपाच्या आराेग्य निरीक्षकांचे दुर्लक्ष हाेत आहे.
निमवाडी रस्त्यावरील पथदिवे बंद
अकोला : मुख्य मार्गावरील पथदिवे सुरू राहत असल्याचा दावा मनपाकडून केला जातो. मात्र, खदान पोलीस ठाणे ते निमवाडी लक्झरी बस स्टँड मार्गावरील पथदिवे बंद असल्याचे चित्र आहे. या रस्त्यावरील वाहतुकीची वर्दळ लक्षात घेता मनपाने तातडीने पथदिवे सुरू करण्याची मागणी हाेत आहे.
दुभाजकांलगत मातीचे ढीग
अकोला : शहरातील मुख्य रस्त्यांची झाडपूस केल्यानंतर साचणाऱ्या मातीची विल्हेवाट न लावता मनपाचे सफाई कर्मचारी दुभाजकांलगत मातीचे ढीग लावत असल्याचे दिसून येते. वाहनांमुळे दिवसभर मातीचा धुराळा उठत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. ही बाब आराेग्य निरीक्षकांच्या निदर्शनास येत नाही का, असा सवाल उपस्थित झाला आहे.
‘माेकाट श्वानांचा बंदाेबस्त करा!’
अकोला : शहराच्या विविध भागांत भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. वाशिम बायपास चौकातील कमलानगर चाैक, भांडपुरा चाैक, माेठी उमरी व परिसरात मोकाट कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. वाहनचालकांना रात्री या भागातून प्रवास करणे मुश्कील झाले आहे. मनपाने नियुक्त केलेल्या कंत्राटदाराने बंदाेबस्त करण्याची मागणी हाेत आहे.