वैदर्भीय नाट्य कलाप्रेमींचा कोरोना विरोधात लढा; व्हिडीओ द्वारे होणार अभिनय स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 10:24 AM2020-04-01T10:24:10+5:302020-04-01T10:24:16+5:30
'घरबसल्या जोपासू... वारसा कलेचा' या टॅग लाईन खाली वैदर्भीय कलावंतांनी एकत्र येऊन महाराष्ट्र राज्यस्तरीय नाट्य अभिनय स्पर्धा आयोजन करीत आहे.
- नीलिमा शिंगणे-जगड
अकोला: 'कोरोना'च्या संकटामुळे सर्वांनाच घरात थांबणं बंधनकारक आहे. त्याला कलाकार मंडळी ही अपवाद कशी असू शकतील.
सर्व कलाकार घरीच बसलेले आहेत. परंतु, काहीही झालं तरी 'हाडाचा कलाकार' गप्प बसणं शक्य नाही.म्हणूनच कलेशी असणारी नाळ कायम राहावी
आणि 'कोरोना'मुळे सतत घरी राहणं कुठेतरी सुसह्य आणि सुखकारक व्हावे, यासाठी वैदर्भीय कलाप्रेमी एक आगळीवेगळी संकल्पना राबवित आहे.
'संकल्पना आमची आविष्कार तुमचा' 'घरबसल्या जोपासू... वारसा कलेचा' या टॅग लाईन खाली वैदर्भीय कलावंतांनी एकत्र येऊन महाराष्ट्र राज्यस्तरीय नाट्य अभिनय स्पर्धा आयोजन करीत आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, नागपूर शाखेच्या वतीने ही स्पर्धा आयोजित केली आहे. यात व्हिडिओद्वारे कलावंतांना सादरीकरण पाठवायचे आहे .
यामध्ये एकपात्री,नाट्यछटा आणि स्वगत या प्रकाराचा सहभाग असेल. तिन्ही पैकी एक सादरीकरण कलावंतांना पाठवायचे आहे. सादरीकरण वेळ - ५ ते ७ मिनिटे असावी. यासाठी विषयाचे बंधन नाही.प्रवेशिका व व्हिडिओ पाठवण्याची अंतिम मुदत १४ एप्रिल २०२० आहे. १४ एप्रिल हा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नागपूर शाखेचा वर्धापन दिन असल्याने यानिमित्ताने स्पधेर्चे आयोजन केले आहे.
या स्पधेर्साठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. सदरील चित्रीकरण हे कलाकारांच्या घरातीलच असावे. ही स्पर्धा महाराष्ट्रस्तर आहे. विजेता स्पर्धकास ३००१, २००१,१००१ अनुक्रमे प्रथम, व्दितीय व तृतीय असे तीन आणि ५०१ रुपयांचे दोन उत्तेजनार्थ रोख पारितोषिके व स्मतिचिन्ह तसेच सहभागी कलावंतांना प्रमाणपत्र पुरस्कार वितरण सोहळ्यात देण्यात येईल . व्हिडिओ सोबत आपले नाव, पत्ता व मोबाईल नंबर पाठवावा. नाटयपरिषद नागपुरच्या अधिकृत ईमेल पत्त्यावर व्हिडीओ पाठवावे. नागपुरातील जेष्ठ कलावंत या स्पधेर्चे परीक्षण करतील. विजेत्या स्पर्धकांना पुरस्कार वितरण सोहळ्यात सादरीकरण करावे लागणार आहे. नरेश गडेकर किशोर आयलवार संजय रहाटे स्पर्धा यशस्वीतेसाठी प्रयत्न करीत आहे.
‘नाट्य कलावंत आणि रसिकांनी कोरोना संकटावर मात करण्यासाठी 'घरीच थांबा.. घराबाहेर जाऊ नका. घरी थांबूनच रंगदेवतेची आराधना करावी.'
प्रफुल्ल फरकसे
अध्यक्ष
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद.
नागपूर शाखा