सौभाग्याचं लेणं विकून केले डिजीटल स्कुलचे स्वप्न साकार
By admin | Published: August 13, 2015 10:44 PM2015-08-13T22:44:38+5:302015-08-13T22:44:38+5:30
लोकमत प्रेरणावाट ; विद्यार्थ्यांच्या विकासासाठी शिक्षकाच्या पत्नीची तळमळ.
फहीम देशमुख /शेगाव (बुलडाणा): राज्यात डिजीटल स्कुल, ई-लर्निंग यासारखे आधुनिक प्रयोग शिक्षण क्षेत्रात सुरू असताना, या स्पर्धेत आपले विद्यार्थीही मागे पडू नयेत, या उद्देशाने डिजीटल क्लासरूम उभारण्यासाठी २/३ महिने लोकसहभाग चळवळ राबविली; मात्र तरीही हव्या त्या प्रमाणात यश मिळाले नाही. त्यामुळे हताश झालेल्या एका शिक्षकाचे नैराश्य त्याच्या पत्नीने स्वत:चे दागिने विकून दूर केले. शेगाव तालुक्यातील तरोडा कसबा जिल्हा परिषद शाळेच्या एका शिक्षकाच्या पत्नीने समाजाला ही प्रेरणावाट दाखविली आहे. शेगाव तालुक्याअंतर्गत येणार्या तरोडा कसबा येथील जिल्हा परिषद शाळेचे सहाय्यक अध्यापक राजेश वासुदेव कोगदे यांची डिजीटल स्कुलच्या निर्मितीची तीव्र इच्छा होती; मात्र पुरेशा निधीअभावी त्यांची ही इच्छा केवळ स्वप्नवत होती. त्यांनी पत्नी सौ. छाया हिच्याजवळ इच्छा व्यक्त करून डिजीटल स्कुलअभावी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास रखडला असल्याची खंत व्यक्त केली. कोगदे यांच्या पत्नीला त्यांच्यातील विद्यार्थ्यांविषयीची तळमळ प्रकर्षाने दिसली. त्यांनी शाळेच्या डिजीटल क्लासरूमसाठी स्वत:चे दागिने विकून २४ हजार रूपयांची रक्कम उभी केली. या पैशातून शाळेसाठी एलईडी टीव्ही खरेदी केला जाणार असल्याचे कोगदे यांनी सांगितले. माझे पती शिक्षणाच्या माध्यमातून समाजऋण फेडण्याचा प्रयत्न करीत आहेत, याचा मला अभिमान असून, तेच माझा खरा अलंकार आहेत, असे सौ. छाया कोगदे यांनी सांगितले. विद्यार्थीरूपी रत्नांना पैलु पाडण्याच्या त्यांच्या कामात योगदान देण्याची संधी मला मिळाली, याचा आनंद आहे. लवकरच मान्यवरांच्या हस्ते डिजीटल क्लासरूमचे लोकार्पण केली जाईल. सर्वांच्या सहकार्याने शाळेतील प्रत्येक वर्ग डिजीटल करण्याचा प्रयत्न असून, यातून शैक्षणिक विकासाचे चक्र गतिमान होईल, असे मत राजेश कोगदे यांनी व्यक्त केले.