अभियंत्याची नाेकरी साेडून शेतीत पेरताे भविष्याचे स्वप्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:13 AM2021-01-01T04:13:33+5:302021-01-01T04:13:33+5:30
२२ एकर शेतीत राबताेय उच्चशिक्षित युवक; करीअर म्हणून शेतीच करण्याचा केला संकल्प राजेश शेगाेकार अकाेला : शेतीत काय ...
२२ एकर शेतीत राबताेय उच्चशिक्षित युवक; करीअर म्हणून शेतीच करण्याचा केला संकल्प
राजेश शेगाेकार
अकाेला : शेतीत काय पडले आहे, मुलीचे लग्न करता येत नाही, मुलांना शिक्षण देता येत नाही, कितीही मेहनत करा शेती ताेट्याचीच हाेते... हा सार्वत्रिक अनुभव असल्याने नैराश्यापाेटी शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. दुसरीकडे शेती विकून वेगळा चरितार्थ शाेधणारेही कमी नाहीत. अशा विपरीत परिस्थितीत उच्च शिक्षण झालेल्या तरुणाने अर्धा लाख पगाराची चांगली नाेकरी साेडून शेतीत रमण्याचा धंदा सुरू केला आहे. अकाेला तालुक्यातील सांगवी बाजार या शिवरातील २२ एकर शेतीत हा युवक त्याच्या भविष्याचे स्वप्न पेरत असून, त्याची कृती शेतीक्षेत्रातील नैराश्यवादी वातावरणासाठी एक आशेचा किरण ठरली आहे.
श्याम दामाेधर मनतकार असे या ...वर्षाच्या ध्येयवेड्या तरुणाचे नाव आहे. मूळचा मनात्री येथील रहिवासी असलेल्या श्यामचे आई-वडील शेतकरीच. आपल्या मुलांनी चांगले शिकावे, माेठे व्हावे असे या पालकांचे स्वप्न. या स्वप्नांना आजीने पंख दिले. आजीची सांगवी बाजार येथे २२ एकर शेती. तिला आधार म्हणून श्याम व त्याची बहीण दाेघेही आजीसाेबत सांगवी बाजार येथेच शिकले. श्याम हा बी ई मॅकेनिकल इंजिनीअर झाला. बहीण एमबीए झाली. दाेघेही पुण्यात चांगल्या कंपनीत नाेकरीला लागले. श्यामला एनटीपीसी या नामांकित कंपनीत नाेकरी मिळाली. तिथे दाेन वर्षे नाेकरी केल्यावर आणखी चांगला पगार मिळावा म्हणून एल ॲण्ड टीमध्ये आलेल्या संधीचा स्वीकार केला. तेथेही दाेन वर्षे रमल्यावर त्याला कामाचा आनंद मिळत नव्हता. दुसरीकडे आजीकडून आलेली २२ एकर शेती ठेक्याने करावी लागत हाेती. त्यामुळे आपण शेती केली तर? हा विचार त्याच्या मनात रुंजी घालू लागला. अभियांत्रिकीचे शिक्षण घेताना तसेही ताे सांगलीत मित्रांच्या शेतावर जात असे. त्यामुळे शेतीच करायची हा विचार त्याच्या मनात पक्का झाला. पण, त्याने घरी सांगितल्यावर साहजिकच भिकेचे डाेहाळे कशासाठी? असा त्रागा करीत पालकांनी ठाम विराेध केला. मात्र श्यामचा संकल्प पक्का झाल्याने त्याने २०१६ राेजी नाेकरीचा राजीनामा देऊन अकाेला गाठले अन् शेती सुरू केली. आजही ती ताे कसत आहे.
बाॅक्स
ताेट्यानेच झाली शेतीची सुरुवात
२०१६ मध्ये शेतीत राबायला सुरुवात केल्यावर शेतीचे जेवढे काम जमते ते स्वत: करायचे अन् इतर काम मजुरांकडून करून घ्यायचे या त्याच्या विचाराला पहिलाच धक्का बसला. शेतीत आता मजूरच मिळत नाहीत हे लक्षात आल्यावर ताे यांत्रिकीकरणाकडे वळला. पहिल्या वर्षी २२ एकरातील १५ एकरावर ठेंच्या पेरला ताे पूर्ण उगवल्यावर राेटाव्हेटरने शेतातच गाडून टाकून शेतीचा पाेत सुधरवला. या प्रयाेगात त्याची बचत संपली व पहिलीच बाेहणी ताेट्याची ठरली. हा ताेटा त्याने त्याच हंगामात हरबरा पेरून भरून काढला. एकरी १३ क्विंटलचे उत्पादन त्याला झाले व शेतीत समाधान आणी उत्पन्न दाेन्ही मिळते यावर त्याचा विश्वास बसला. यंदा दाेन एकरावर पऱ्हाटी, १५ एकरावर साेयाबीन अन् उर्वरित शेतात त्यानी हायब्रीड पेरले. साेयाबीनला पावसाने झाेडपले, संपूर्ण हायब्रीड रानडुकरांनी फस्त केले; मात्र पऱ्हाटीला एकरी १८ क्विंटलचे उत्पादन झाले. अजून दाेन क्विंटल कापूस निघण्याची आशा त्याला आहे. हीच आशा त्याला शेतीत भविष्य असल्याचे बळ देते हे विशेष.