जिल्ह्यातील १३१ ठिकाणांहून वाहने जपूनच चालवा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:19 AM2021-02-16T04:19:43+5:302021-02-16T04:19:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन करून भरधाव वेगात वाहन चालविण्याची प्रवृत्ती वाढत आहे. याच ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन करून भरधाव वेगात वाहन चालविण्याची प्रवृत्ती वाढत आहे. याच कारणामुळे जिल्ह्यात २०२० या वर्षात शंभरापेक्षा अधिक अपघातांच्या घटना घडल्या. त्यातील सर्वाधिक घटना ‘अपघात प्रवण स्थळ’ म्हणून घोषित केलेल्या १३१ ठिकाणांवर घडल्या आहेत.
जिल्ह्यातील विविध भागांत घडणाऱ्या अपघातांच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी रस्ता सुरक्षा समितीकडून नोंदविण्यात येणाऱ्या निष्कर्षानुसार दर तीन वर्षांनी अपघात प्रवण स्थळ निवडून अपघात रोखण्याकरिता प्रभावी उपाययोजना केल्या जातात. जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गवर तसेच अकोट रॉड, शहरातील मुख्य मार्ग, शिवणी ते रिधोरा नवीन बायपास, बाळापूररोड हे अपघात प्रवण स्थळे आहेत.
रस्ता सुरक्षा अभियानाच्या कालावधीत पोलीस विभाग, उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या चमूकडून वाहनचालकांचे उद्बोधन केले जात आहे. सदर स्थळांवर अपघातांपासून बचावाच्या दृष्टीने सूचनाफलक लावण्यासह साइन बोर्डदेखील लावण्यात आले आहेत. वाहनचालकांनीही स्वत:चा जीव सुरक्षित ठेवण्यासाठी केवळ ‘ब्लॅक स्पॉट’च नव्हे, तर अन्य ठिकाणांच्या रस्त्यांवरही वाहने जपूनच चालवावी, असे आवाहन केले जात आहे.
या ठिकाणी गाडी जपून चालवा, या ठिकाणी तुलनेने अधिक अपघात घडलेले आहे. त्यामुळे गाडी जपून चालविणे आवश्यक ठरले आहे. असे फलक लावलेले असतानाही वाहनचालक मात्र सुसाट वाहने चालवित असल्याने अपघात घडत असल्याचे वास्तव आहे.
अपघात प्रवण स्थळावर दहापेक्षा अधिक बळी
रस्ता सुरक्षा समितीच्या निष्कर्षानुसार जिल्ह्यात घोषित करण्यात आलेल्या अपघात प्रवण स्थळावर जवळपास ६४ घटना घडल्या आहेत. त्यात दहापेक्षा अधिक लोकांना जीव गमवावा लागला आहे. अपघात प्रवण स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेल्या ठिकाणांमध्ये राष्ट्रीय महामार्गावरील विमानतळ परिसर, बाबूळगाव, बोरगाव मंजू, कुरणखेड, माना कुरुम व मूर्तीजापूरचा समावेश आहे. यासोबतच पातूर घाट-अकोटरोड-अकोट-अंजनगावरोड नव्याने झालेल्या अकोला-म्हैसांगरोडवर सर्वाधिक अपघात होत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे ही स्थळे अपघातप्रवण स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेली आहेत.
मागील वर्षी अपघातांची संख्या
जानेवारी १७
फेब्रुवारी १३
मार्च १५
एप्रिल ०३
मे ०१
जून ०६
जुलै १४
ऑगस्ट १२
सप्टेंबर १७
ऑक्टोबर २१
नोव्हेंबर १८
डिसेंबर १७