वाहनचालकांचे उत्पन घटले, खर्च वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:20 AM2021-05-27T04:20:07+5:302021-05-27T04:20:07+5:30

अनेकांची वाहने घरातच उभी : बँकांचे हप्तेही भरता येईना लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : काेराेना संसर्ग राेखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ...

Driver's income decreased, expenses increased | वाहनचालकांचे उत्पन घटले, खर्च वाढला

वाहनचालकांचे उत्पन घटले, खर्च वाढला

Next

अनेकांची वाहने घरातच उभी : बँकांचे हप्तेही भरता येईना

लोकमत न्यूज नेटवर्क

अकोला : काेराेना संसर्ग राेखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लावले असून, त्याचा फटका प्रवासी वाहतूक करण्यासाठी वाहने खरेदी करणाऱ्यांनाही बसला आहे. व्यवसायासाठी खरेदी केलेली मोठमोठी चारचाकी वाहने घरीच पडून आहेत. त्यामुळे वाहनचालकांचे उत्पन्न घटले असून, याउलट खर्च वाढला आहे. त्यामुळे हा खर्च भागवायचा कसा, असा प्रश्न भेडसावत आहे.

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती. त्यामुळे १३ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून कडक निर्बंध लावण्यात आले. त्यासोबतच आंतरजिल्हा व आंतरबाह्य प्रवासाला निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे टूर्स अँड ट्रॅ्व्हल्सचा व्यवसायही ठप्प आहे. या व्यवसायासाठी अनेकांनी मोठमोठ्या गाड्यांची खरेदी केली. परंतु, आता प्रवास बंद असल्याने गाड्या घरीच पार्किंग आहेत. त्यामुळे त्यांचे उत्पन्न बंद आहे; परंतु गाडीचा मेंटेनन्स, कर्जाचे हप्ते भरावे लागत आहेत. शहरात महागड्या चारचाकी व दुचाकी वाहनांचा वापर करणारे शाैकीन मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र, आता त्यांनाही बाहेर पडणे अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे वाहने घरातच पार्क केलेली आहेत. काहींनी तर दोन महिन्यांपासून वाहन पार्किंगमधून काढलेच नसल्याचे स्थिती आहे.

वाहने सुरू पण गॅरेज बंद

अत्यावश्यक सेवेतील वाहने धावत आहेत. त्यासोबतच दुचाकी व चारचाकी वाहनांचा वापर अनेकजण करत आहेत. परंतु, एखाद्या वेळेस गाडीत बिघाड आल्यास गॅरेज बंद असल्याने मोठी पंचायत होत आहे. सध्या गाडीत हवा भरणेही अडचणीचे झाले आहे. अनेकांना आपल्या गाडीचे सर्व्हिसिंग करायचे आहे. मात्र, शोरूम बंद असल्याने त्यांना गाडीची सर्व्हिसिंग करता येत नसल्याचे चित्र आहे.

वाहनचालकांसमोर अडचणींचा डोंगर

गॅरेज व शोरूम बंद असल्याने वाहनात काही तांत्रिक बिघाड झाल्यास माेठी अडचण निर्माण होत आहे. काहींच्या गाड्या पंक्चर झाल्या असून, गॅरेज बंद असल्याने घरीच पडून आहेत. तर काहींना गाडीची वॉशिंग व सर्व्हिसिंग करायची आहे. मात्र, तेसुद्धा करताना अडचणीचे जात आहे. व्यवसाय ठप्प झाल्याने अनेकांना बँकांचे हप्तेही भरता आलेले नाहीत.

वाहने पार्किंगगमध्येच

टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करण्याच्या उद्देशाने वर्षभरापूर्वी कर्जावर गाडी घेतली. मात्र, लगेच लॉकडाऊन सुरू झाला. त्यामुळे प्रवासाला बंदी असल्याने गाडी घरीच पार्किंगमध्ये पडून आहे. कर्जाचे हप्ते कसे भरायचे, असा प्रश्न आहे.

उदय भाकरे, अकोट

चारचाकीची आवड असल्याने मोठ्या आवडीने कार घेतली. परंतु, गतवर्षीपासून लॉकडाऊन सुरू झाला. त्यामुळे व्यवसाय ठप्प पडल्याने घरीच आहे. त्यामुळे गाडीसुद्धा पार्किंगमध्येच आहे. गाडीचा वापरच होत नसल्याने फालतूच घेतल्याचे वाटत आहे.

नरेंद्र बढे, अकोला

गॅरेजवाल्यांची राेजीराेटी बंद

प्रयत्न करूनही नोकरी मिळाली नाही, त्यामुळे गॅरेज टाकले. व्यवसायात जम बसत असतानाच लॉकडाऊन लागले. आता गॅरेज बंद आहे. भाडे कसे द्यायचे, कर्ज कसे फेडायचे, उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न पडला आहे.

इम्रान खान, गॅरेज संचालक

गॅरेजमधून दोघांना रोजगार दिला होता. परंतु, कडक निर्बंधामुळे गॅरेज बंद असल्याने राेजगार गेला आहे. व्यवसायच बंद असल्याने घरखर्च कसा भागवायचा, अशी मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे कर्ज वाढत आहे. शासनाने गॅरेज मालकांना मदत करण्याची मागणी हाेत आहे.

निजाम साहेब, गॅरेज मालक

Web Title: Driver's income decreased, expenses increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.