दारू पिऊन वाहन चालविल्यास लायसन्स होऊ शकते रद्द!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:22 AM2021-09-14T04:22:55+5:302021-09-14T04:22:55+5:30
वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघाताच्या घटनांवर नियंत्रण मिळविता येऊ शकतो. अनेक जण वाहतूक नियमांचे पालन करण्याकडे दुर्लक्ष करतात. वाहतूक ...
वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघाताच्या घटनांवर नियंत्रण मिळविता येऊ शकतो. अनेक जण वाहतूक नियमांचे पालन करण्याकडे दुर्लक्ष करतात. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जाते; याशिवाय दारू पिऊन वाहन चालविणे, अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या वाहन चालकाचा परवानादेखील निलंबित केला जातो. संभाव्य कारवाई टाळण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करणे वाहनचालकांसाठी आवश्यक ठरत आहे.
---------------------हे नियम मोडल्यास लायसन्सचे निलंबन!
दारू पिऊन अथवा अमली पदार्थाचे सेवन करून वाहन चालविल्यास (ड्रंक अँड ड्राइव्ह) दंडात्मक कारवाई, तसेच लायसन्स निलंबित करण्याबाबत वाहतूक शाखेकडून आरटीओकडे प्रस्ताव सादर केला जातो.
एखाद्या चालकाकडून अपघाताची घटना घडल्यास या प्रकरणातही चालक परवाना निलंबित करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात येतो. तीन महिने किंवा काही घटनांमध्ये अधिक कालावधीसाठी परवाना निलंबित होऊ शकतो.
-----------------------अशी होते कारवाई
वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या चालकाविरुद्ध परवाना निलंबनाच्या कारवाईचा प्रस्ताव वाहतूक पोलीस शाखेकडून आरटीओकडे पाठविण्यात येतो. मोटार वाहन अधिनियमातील तरतुदीनुसार आरटीओकडून विहित कालावधीसाठी परवाना निलंबनाची कारवाई करून वाहतूक शाखेकडे फाईल पाठविली जाते.
----------------------चार वर्षांतील कारवाई
२०१८ १९
२०१९ १७
२०२० १०
२०२१ ०७
----------------------------प्रत्येकाने वाहतूक नियमांचे पालन करावे
रस्ते अपघाताच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रत्येकाने वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. वाहतूक नियम न पाळणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध वाहतूक शाखेतर्फे दंडात्मक कारवाई केली जात आहे. ड्रंक अँड ड्राइव्ह, अपघात अशा घटनांतील चालक परवाना निलंबित करण्याबाबत आरटीओकडे प्रस्ताव पाठविला जातो. चालू वर्षात पाच प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत.
विलास पाटील
वाहतूक शाखा प्रमुख, अकाेला