विश्रांतीनंतर रिमझिम पावसाला सुरूवात, पिकांना नवसंजिवनी, शेतकऱ्यांना दिलासा
By रवी दामोदर | Published: August 18, 2023 06:06 PM2023-08-18T18:06:27+5:302023-08-18T18:06:50+5:30
हवामान विभागाचा जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’, यंदा मान्सून विलंबाने दाखल झाल्याने पेरण्यांना उशिर झाला आहे. खरीप हंगामाच्या पेरण्यांना जूलै महिन्यात सुरूवात झाली.
अकोला : जूलै महिन्याच्या शेवटच्या आवठड्यात जोरदार बरसल्यानंतर पावसाने दडी दिली होती. त्यामुळे बहरलेले पिके सुकण्याच्या मार्गावर होते. तीन आठवड्याच्या विश्रांतीनंतर शुक्रवार दि. १८ ऑगस्ट रोजी रिमझिम पावसाने हजेरी लावल्याने पिकांना संजिवनी मिळाली असून, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. उसंतीनंतर आता पुन्हा तीन दिवस पावसाची रिपरिप राहणार असून, दि.२१ ऑगस्टपर्यंत प्रादेशिक हवामान विभागाने जिल्ह्याला पावसाचा ‘यलो अलर्ट’ दिला आहे.
यंदा मान्सून विलंबाने दाखल झाल्याने पेरण्यांना उशिर झाला आहे. खरीप हंगामाच्या पेरण्यांना जूलै महिन्यात सुरूवात झाली. जुलैच्या पहिल्या आठवड्यापासूनच जिल्ह्यात मान्सून सक्रिय झाल्याने जिल्ह्यातील पेरण्या आटोपल्या आहेत. मात्र, यामध्ये मूग व उडदाचे पीक मात्र बाद झाले. पहिल्या टप्प्यातील सोयाबीन आता फुलोऱ्यावर आलेले आहे. या दरम्यान पावसाची आवश्यकता असते. परंतू पावसाने दडी मारल्यामुळे जिल्ह्यातील काही भागातील पिकांची वाढ खुंटली होती, तर अनेक भागात पिके सुकण्याच्या मार्गावर होते. पिकांच्या संरक्षणासाठी सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी सिंचन सुरू केले होते. दरम्यान, शुक्रवारी जिल्ह्यात रिमझिम पावसाने सुरूवात करताच शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यंदा जिल्ह्यात सोयाबीनची सार्वाधिक पेरणी आटोपली असून, काही भागात पिके फुल अवस्थेत आहेत.