विदर्भातील सात जिल्ह्यांवर मदतीचा दुष्काळ!
By admin | Published: March 12, 2016 02:29 AM2016-03-12T02:29:55+5:302016-03-12T02:29:55+5:30
विदर्भावर अन्याय; विदर्भातील केवळ ५३५ गावांचाच समावेश.
ब्रम्हानंद जाधव/मेहकर
विदर्भात दुष्काळाच्या झळा अधिक असल्याने शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. असे असतानाही ५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारीत विदर्भावर अन्याय दिसून येत आहे. राज्यात सन २0१५-१६ मध्ये एकूण १४ हजार ७0८ गावांची पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी दाखविण्यात आली असून, राज्याच्या तुलनेत विदर्भातील केवळ ५३५ गावांचीच पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी दाखविण्यात आली आहे. ५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारीमध्ये विदर्भातील सात जिल्ह्यांचा समावेशच नसल्याचे या जिल्ह्यांवर शासनाच्या मदतीचाही दुष्काळ आहे.
दुष्काळाची तीव्रता अधिक असल्याने याचा सर्वाधिक फटका शेतकर्यांना बसत आहे. खरीप व रब्बी हंगामातील नजरअंदाज पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी असलेल्या गावांमध्ये शासनाकडून विविध योजना राबवून शेतकर्यांना आधार दिला जात आहे. गतवर्षी राज्यभर अत्यल्प पावसामुळे उत्पादनात मोठी घट झाली, तर विदर्भातील शेतकर्यांना शेतीसाठी लागलेला खर्चही भरून निघाला नाही. सन २0१५-१६ मधील खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी काढून ५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांकरिता शासनाकडून विविध योजना राबविण्यात येतात; मात्र अनेक गावांमध्ये दुष्काळ असतानाही पैसेवारी जास्त दाखविण्यात आलेली आहे.
राज्यातील ४0 हजार ५३ गावांमध्ये पैसेवारी जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामध्ये १४ हजार ७0८ गावांची पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी व २५ हजार ३४५ गावांची पैसेवारी ५0 पैशांपेक्षा जास्त दाखविण्यात आलेली आहे. तथापि, राज्याच्या तुलनेत विदर्भातून सर्वांत कमी गावांचा समावेश ५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारीत करण्यात आला आहे. विदर्भातील १५ हजार २६४ गावांची पैसेवारी जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामध्ये विदर्भातून केवळ ५३५ गावांचीच पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी दाखविण्यात आली आहे, तर १४ हजार ७२९ गावांची पैसेवारी ५0 पैशांपेक्षा जास्त दाखविण्यात आलेली आहे. दुष्काळ अधिक असूनही पैसेवारीमध्ये राज्याच्या इतर विभागांच्या तुलनेत विदर्भावर अन्याय झाला असल्याचे दिसून येत आहे.
विदर्भातील अमरावती, बुलडाणा, वाशिम, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या सात जिल्ह्यांचा ५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारीमध्ये समावेशच नाही. त्यामुळे ५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांना मिळणार्या शासानाच्या विविध योजनांच्या लाभापासून विदर्भातील सात जिल्ह्यांतील शेतकर्यांना वंचित राहावे लागणार आहे.
विदर्भ दुष्काळात समोर; पैसेवारीत माघार
सन २0१५-१६ खरीप हंगामातील हंगामी पैसेवारीमध्ये विदर्भातील अनेक गावांचा ५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारीमध्ये समावेश करण्यात आलेला नाही. विदर्भातील अमरावती विभागामध्ये तर केवळ ५७ गावांचाच ५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील ५५ व यवतमाळ जिल्ह्यातील दोन गावांचा समावेश आहे. नागपूर विभागातून ४७८ गावांचा ५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. त्यामध्ये नागपूर जिल्ह्यातील १११ व गडचिरोली जिल्ह्यातील ३६७ गावांचा समावेश आहे. त्यामुळे राज्याच्या तुलनेत विदर्भातील केवळ ५३५ गावांचीच पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी दाखविण्यात आल्याने विदर्भाबाबत ह्यदुष्काळात समोर, तर पैसेवारीत माघारह्ण अशी परिस्थीती निर्माण झाली आहे.